Tue, Sep 22, 2020 10:45होमपेज › Sangli › सांगली राष्ट्रवादी जिल्हा शहर उपाध्यक्षाचा निर्घृण खून 

सांगली राष्ट्रवादी जिल्हा शहर उपाध्यक्षाचा निर्घृण खून 

Published On: | Last Updated:
कुपवाड/सांगली : पुढारी वृत्तसेवा

कुपवाड (ता. मिरज) येथील औद्योगिक वसाहतीतील एका कोल्ड स्टोअरेजमध्ये राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षांचा निर्घृण खून करण्यात आला.दत्तात्रय महादेव पाटोळे (वय 41, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) असे मृताचे नाव आहे.  शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. धारदार शस्त्राने डोक्यासह अन्य ठिकाणी वार करून हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, तीन संशयितांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पाटोळे कुपवाड शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष म्हणून काम करीत होते. कुपवाड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीला ते कामगारांचा पुरवठा करीत होते. शुक्रवारी दुपारी पाटोळे मिरज एमआयडीसीत कामगारांचा पगार देऊन मोटारसायकल (एमएच 10 डीसी  7002) वरून घरी निघाले होते.   रस्त्यात बाजूला लपून बसलेल्या तिघांनी त्यांना अडवले. त्यांच्या हातात शस्त्रे पाहून पाटोळे मोटारसायकल रस्त्यावरच सोडून जवळच असलेल्या एका कोल्ड स्टोअरेजकडे पळाले. 

तेथे जाऊन ते  व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये लपून बसले होते. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांना केबिनमध्ये गाठले. त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने अमानुषपणे वार करण्यात आले.  डोक्यात खोलवर सात वार करण्यात आले होते. त्यावेळी कोल्ड स्टोअरेजमधील कामगार विजय सावंत (रा. बजरंगनगर) यांनी पाटोळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात सावंत जखमी झाला आहे. 

हल्लेखोरांनी  निर्घृणपणे पाटोळेंच्या डोक्यात वार केले. त्यामुळे  त्यांचा मेंदू बाहेर आला होता. रक्ताच्या थारोळ्यात ते पडले. ते ठार  झाल्याची खात्री करून हल्लेखोर तेथून निघून गेले. 

कुपवाड पोलिसांसह अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, मिरजेचे उपअधीक्षक संदीपसिंह गिल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. 

तोपर्यंत पाटोळे यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रकरणी चैतन्य सखाराम पाटोळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रात्री उशिरा सांगलीतील शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शासकीय रूग्णालयात पाटोळे यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. 

तब्बल अकरा वार

पाटोळे यांचा खून अतिशय निर्घृणपणे करण्यात आला. त्यांच्या डोक्यात तसेच मानेवर तब्बल सात वर्मी वार करण्यात आले होते.  वार चुकवताना त्यांच्या दोन्ही हातांवरही चार वार झाले आहेत. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने अकरा वार केल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. 

संशयित सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

पोलिसांनी घटनास्थळ आणि आसपासचे सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे चित्रण तपासले. त्यामध्ये तीन संशयित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही हा खून पाच जणांनी केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. हल्लेखोरांनी मास्क घातला नव्हता; तसेच चेहराही झाकण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे यातील तीन संशयितांची नावे स्पष्ट झाली आहेत. त्यांना लवकरच अटक करू, असे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले. 

 "