Mon, Sep 21, 2020 17:32होमपेज › Youthworld › 'व्हॅलेंटाईन डे'ची एक अधुरी कहाणी...

'व्हॅलेंटाईन डे'ची एक अधुरी कहाणी...

Last Updated: Feb 14 2020 12:27PM
अभ्युदय रेळेकर

माणूस हा आठवणीत रमणारा प्राणी आहे. मग तो कुणीही असो. अगदी कालचंच उदाहरण घ्या. ज्येष्ठ उद्योगपती टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी त्यांची एक आठवण शेअर केली आहे. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या रतन टाटा यांनी आपणही कोणे एकेकाळी प्रेमात पडलो होते, असे सांगितले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्यामुळे त्यांची ताटातूट झाली आणि त्यांचे प्रेम अधुरे राहिले. विशेष म्हणजे त्यांनी पुन्हा लग्नही केले नाही. मात्र, त्यांनी आजही प्रेमाची हुरहूर ह्रदयात बाळगली आहे, हे यावरुन अधोरेखित होते. 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनातली अशी काहीतरी आठवण नक्कीच जागी होत असणार यात शंकाच नाही.

शालेय तसंच कॉलेज जीवनात जवळ-जवळ प्रत्येकाची अशी एक व्हॅलेंटाईन असतेच. याच्याच जोडीनं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी ही व्हॅलेंटाईन जवळजवळ ९० टक्के जणांची फक्त स्वप्नात आणि आठवणीतच राहते. तर जास्तीत-जास्त दहा टक्केंच्याच आयुष्यात ती प्रत्यक्षात येते, असेच म्हणावे लागेल. मात्र, तिची मनातील आठवण जेव्हा-जेव्हा जागी होते तेव्हा काळजात हुरहूर दाटून आल्याशिवाय राहात नाही, हे प्रत्येकजण मान्य करील. या आठवणीच्या हिंदोळ्यावर माणूस खऱ्या अर्थाने जगत असतो. आयुष्यातील असेच अनेक अनमोल क्षण आणि आठवणी माणसाला जगण्याची ऊर्जा देत असतात.

Image result for heart flowers neckles

आठवणीच्या कप्प्यातली आमच्या एका सहअध्यायीची २१ वर्षापूर्वीची आठवण व्हॅलेंटाईन डे निमित्त शेअर करावी अशीच म्हणावी लागेल. पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारितेच्या लौकिक शिक्षणाचे दिवस हे खरे सुवर्ण दिवस होते. त्याच काळातील हा किस्सा. अगदी चित्रपटातल्यासारखाच म्हणता येईल.  कारण ‘ती’ सर्वार्थाने एका वेगळ्या धाटणीची, वेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमिवरची मुलगी होती आणि ‘तो’ तिच्या तुलनेत खूपच वेगळ्या धाटणीचा आणि तुलनने खूपच वेगळ्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून आलेला. पण म्हणतात ना, प्रेमाला कोणत्याच भिंती बांध घालू शकत नाहीत. त्याची अवस्था तशीच होती.

वीस वर्षापूर्वी म्हणजेच १९९७ सालचा व्हॅलेंटाईन डे. त्याने मनाचा हिय्या करुन कोणत्याही परिस्थितीत तिला गुलाब द्यायचे ठरवले होते. त्याला कुणाच्यातरी मदतीची किंवा.. ‘तुम आगे बढो हम कपडे संभालते है’ असे म्हणणाऱ्या एखाद्या मित्राची गरज असते. असा मित्र होण्याची जबाबदारी आमच्यावर आली होती. त्या दिवशी शुक्रवार होता. त्याच दिवशी ‘तिच्या’ ग्रुपमधील एकाचा वाढदिवस होता. ती कुठे भेटेल या विचाराने तो व्याकूळ होता. ती नेमकी कुठे आहे, हे त्याला माहीत नव्हते. त्या दिवशी रानडेवर कुणी फिरकले नाही. मात्र त्याच्या मनात तिला भेटण्याची तीव्र इच्छा होती.

“डॉक्टर आपण आज तिला भेटायचेच आणि गुलाब द्यायचाच.” तो मला सारखे-सारखे ही गोष्ट सांगत होता. मला सगळे डॉक्टर म्हणायचे. दुपारनंतर आम्ही तिला भेटण्याची तयारी केली. डेक्कनला एक छानसं गुलाबाचं फूल घेतलं. त्या पठ्ठ्याने आयुष्यात पहिल्यांदाच गुलाबाचं फूल खरेदी केलं होतं. त्यासाठी तब्बल २० रुपये खर्च केले होते. एकवीस वर्षांपूर्वी २० रुपये म्हणजे त्याची आजची किंमत तुम्ही इमॅजिन करु शकता. गुलाब खरेदी तरी झाली. पण ‘ती’ नेमकी कुठे भेटेल याचा अजून पत्ता नव्हता. तरीही तिचा पत्ता शोधून काढायचाच.. हे मनाशी पक्कं केलं होतं. मग शोध सुरू झाला. आमच्याच वर्गातल्या एकाचा त्यादिवशी वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती गेल्याचे कळले.

Image result for flying heart

तिच्या ज्या मित्राचा वाढदिवस होता त्याच्या घरी ती आणि तिची आणखी एक मैत्रीण पार्टी करण्यासाठी गेले असल्याचे समजले. पुण्यातील पॉश लोकॅलिटीमध्ये त्याने फ्लॅट भाड्याने घेतला होता. कारमधून डिपार्टमेंटला तो येत असे. त्याच्या फ्लॅटचा पत्ता शोधण्याच्या मोहिमेला आम्ही लागलो. बसमधून त्याच्या अपार्टमेंटच्या जेवढ्या जवळ जाता येईल तेवढ्या जवळच्या बसस्टॉपपर्यंत गेलो. तिथे उतरल्यावर रिक्षा करण्याचा निर्णय घेतला. रिक्षा करुन फ्लॅटवर पोहोचलो. त्याच्यापेक्षा माझी धडधड अधिक वाढली होती. अर्थात तोही मनातून बावरल्याचं जाणवत होतं. पण पठ्ठ्याचं धाडस वाखाणण्याजोगं होतं. आपल्या मनातील व्हॅलेंटाईनला गुलाबाचे फूल देण्याचा आवेग त्यामध्ये होता. तेवढीच हुरहूर आणि भीतीही त्याच्या मनात होती. याची जाणीवही मला होत होती.

अपार्टमेंटच्या पायऱ्या चढून आम्ही फ्लॅटच्या दारात पोहोचलो. आतून मोठ्या आवाजात म्यूझिक लावल्याचं ऐकू येत होतं. आम्ही धडधडत्या अंतःकरणाने डोअरबेल वाजवली. आत्ता नेमकं आठवत नाही. पण तिनेच दार उघडलं. एकदम ‘केनी जी’च्या सॅक्सोफोनच्या धुनचा मोठा आवाज कानावर पडला. तेवढ्यात तिचा मित्र समोर दिसला, त्याची आणखी एक मैत्रिण म्हणजे आमची सर्वांचीच वर्गमैत्रिणही तिथे होतीच...

“हॅलॉ, हाऊ आर यू डॉक्टर, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. यू केम टू विश मी, थँक्यू व्हेरीमच... डॉक्टर.” इती तो.

आमचा मित्र हातात पिशवी घेऊन तसाच उभा होता.... “अरे.. आप भी आये हो. आईये.. आईये...” माझ्या अवघडलेल्या मित्राचंही त्याने स्वागत केलं. आम्ही आत गेलो. बसलो. ‘तिने’ स्नॅक्सची डिश आणली. मित्राच्या ह्रदयाचे ठोके एव्हाना वाढले होते. माझ्यासमोर बोलताना त्याच्या धाडसाला दाद द्यावी तेवढी कमीच असा त्याचा आविर्भाव होता. पण फ्लॅटवर येताच त्याच्या धाडसाचे पाणी-पाणी झाल्याची जाणीव मला झाली होती. दुसरीकडे का कुणास ठाऊक तिच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचे भाव लपता लपत नव्हते. हे आगंतुक इथे कसे टपकले असेच भाव त्या दोघींच्या डोळ्यांमध्ये मला स्पष्ट दिसले होते.

फ्लॅटवरील एकूणच वातावरण पाहून मित्राचा संपूर्ण उत्साह मावळून त्याचे रुपांतर भीतीमध्ये झाल्याचे जाणवत होते. हे महाशय आता तिला गुलाब देतील की नाही अशीच शंका मनात सारखी येत होती.

Image result for tulips and heart

तरीही मी त्याला डोळ्यांनी खुणावून धाडस देण्याचं काम करत होते. अर्थात मीही आतून जाम घाबरलो होतो. पण करणार काय. शेवटी स्नॅक्सबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आता निघण्याची वेळ आली. त्याने पिशवीतून गुलाब काढला आणि ‘तिला’ देण्याऐवजी त्याच्या हातात दिला आणि म्हणाला, “विश यू व्हेरी हॅपी बर्थ डे संजय...” आणि इथेच व्हॅलेंटाईन डे संपला...

 "