Sun, Aug 09, 2020 01:43होमपेज › Youthworld › शिक्षक दिनी डॉ. राधाकृष्णन यांचे स्मरण

शिक्षक दिनी डॉ. राधाकृष्णन यांचे स्मरण

Published On: Sep 05 2019 10:29AM | Last Updated: Sep 05 2019 10:29AM
डॉ. लीला पाटील

थोर तत्त्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर, 1888 रोजी मद्रासपासून चाळीस मैल लांब चित्तूर जिल्ह्यातील तिरूताणी गावात झाला. तिरूपती येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वेलोर येथील व्हरीय या महाविद्यालयात तीन वर्षे उच्च शिक्षण घेऊन मद्रास येथून तत्त्वज्ञान विषय घेऊन विशेष प्राविण्यासह ते बी.ए. झाले. ‘वेदातील नीतीशास्त्र’ हा प्रबंध डॉ. हॉग या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मार्गदर्शनाखाली मद्रास विद्यापीठाला सादर केला. तो मान्य झाला तेव्हा ते अवघे वीस वर्षांचे होते. ते आदर्श शिक्षक तर होतेच; पण आपल्या चार दशकांचा अध्यापनाच्या कार्यामुळे ते थोर शिक्षणतज्ज्ञ बनले. 1950 ते 1962 या काळात ते उपराष्ट्रपती, तर 1962 ते 65 या काळात त राष्ट्रपती होते. 

सर्वसामान्य माणसापेक्षा शिक्षक हा निर्माता, रचनाकार, शिल्पकार असल्याने त्याला तत्त्वज्ञानाची अधिक आवश्यकता आहे. मुलांवर उत्तम संस्कार, मूल्यांची शिकवण आणि सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय भावना दृढीकरणाची वंदनीयता यांचे रोपण करून नवीन पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याने, त्याच्या विचार, उच्चार व आचाराला तात्त्विक अधिष्ठान नितांत आवश्यक आहे. 21 शतकाला सामोरे जात असण्यासाठी सिद्ध व्हायला हवे असेल, तर शिक्षक तत्त्वज्ञ बनायलाच हवा. डॉ राधाकृष्णन यांच्या विचाराने वाटचाल करणे त्यामुळे आवश्यक आहे. शिक्षकदिनाच्या निमित्ताने हेच विचार अनुकरणीय आहेत.

डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षणाची जी व्याख्या सांगितली ती म्हणजे ‘शिक्षण केवळ साक्षर निर्माण करण्यासाठीचे नसून माणसे निर्माण करण्यासाठी आहे. म्हणजेच, मनुष्याची बुद्धी, हृदय आणि आत्मा यांच्या विकासाला त्यांनी शिक्षण असे म्हटले आहे. ‘शिक्षणातून माणुसकी निर्माण व्हावी’ ही अपेक्षा आहे. आजच्या युगात तर शिक्षणाची डॉ. राधाकृष्णन यांची भूमिका आणि योगदान मौलिक दिग्दर्शनासारखे ठरले. आज लोकसंख्या शिक्षण, नैतिक शिक्षक, मूल्य शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण यासारख्या शिक्षणाच्या संकल्पना महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत, ज्या डॉ. राधाकृष्णन यांनी त्या काळात मांडल्या, त्यांचा डॉ. राधाकृष्णन आयोग (1946-48) हा आजही शैक्षणिक, धोरणासाठी दीपस्तंभ मानला जातो. भारताने आपला सर्वश्रेष्ठ ‘भारतरत्न’ हा किताब राधाकृष्णन यांना 1954 सालीच बहाल केलेला आहे. संस्कृती व सुधारणा ही बाहेर नसून ती अंतरंगात आहे. आज चढाई, लढाई, युद्धे, घातपात, जातीय दंगली, धार्मिक तेढ, रक्तपात यांच्या मुळाशी धर्मवेडेपणा कारणीभूत आहे. डॉ. राधाकृष्णन म्हणतात ‘ईश्‍वरा विषयी एक जीवनधारणा, मानवाविषयी प्रेम आणि अखिल मानवजातीविषयी समभाव हाच भारतीय संस्कृतीप्रमाणे धर्म म्हणता येईल. धर्माचे प्रयोजन मोक्षप्राप्ती नसून मानवाविषयी प्रेम, दया व उदारता वाढविणे होय. याच संस्काराची गरज शिक्षणाचे उपयोजित अध्यापनातून भागविली जावी.  

हिंदू धर्माचे सखोल अध्ययन राधाकृष्णन यांनी केले. तसेच तत्त्वज्ञानाचे अध्ययन करीत असतानाच तत्त्वज्ञान विषयक लेखनही चालू होते. अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांची व्याख्याने व लेखन याचा देशात व परदेशात खूप गाजावाजा होत राहिला. ऑक्सफर्ड व केंब्रिज, हार्वर्ड आणि प्रिस्टन, येल आणि शिकागो तसेच अन्य ठिकाणी त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक, व्यक्तिमत्त्वाची छाप, लेखन-व्याख्यानांचा गाजावाजा होत राहिला. 

डॉ. राधाकृष्णन हे आदर्शवादी शिक्षण शास्त्रज्ञ आहेत. धार्मिक व नैतिक मूल्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे ते मानत. त्यांचा धर्मज्ञ, तत्त्वचिंतक आणि उत्कृष्ट शिक्षक या दृष्टीने भारतातीलच नव्हे, तर विसाव्या शतकातील जागतिक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या थोर शिक्षणशास्त्रात त्यांची गणना करावी लागेल. डॉ. सी. इ. एम. जोड यांनी ‘आधुनिक तत्त्वचिंतकाचा राजा’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. खरा शिक्षक हा खरा तत्त्वज्ञ असतो आणि शिक्षण हे तत्त्वज्ञानाचे गतिमान अंग असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.  खरा शिक्षक कसा असावा हे विचार, उच्चार व आचार या मार्गाने पटवून दिलेले डॉ. राधाकृष्णन हे शिक्षक असल्याने त्यांचाच जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून निवडला जातो, हे फार औचित्यपूर्ण होय.