होमपेज › Youthworld › संगणकाधारित करिअर संधी

संगणकाधारित करिअर संधी

Last Updated: Feb 25 2020 1:29AM




गणेश काळे

भारतीय युवकांमध्ये संगणक शिक्षणातील वाढत्या रुचीमुळे भारताचे महत्त्व जगभरात वाढत चालले आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये आजघडीला भारत आघाडीवर आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. भारताच्या बुद्धिमत्तेची जगात वाहवा होत आहे. देशातील राष्ट्रीय सकल उत्पादनात आयटी क्षेत्र आणि कॉम्प्युटर क्षेत्राचे योगदान वाढत चालले आहे. आऊटसोर्सिंगमुळे परदेशातील नोकर्‍या भारतीयांना आकर्षित करत आहेत. म्हणूनच आयटी क्षेत्र हे विद्यार्थ्यांना करिअरसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आघाडीचे क्षेत्र ठरत आहे.

आयटी सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला बारावीत गणित विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. माहिती आणि तंत्रज्ञान तसेच संगणक क्षेत्रात अन्य क्षेत्राच्या तुलनेने अधिक संधी मिळत आहे. सध्याच्या काळात संगणकांचे लहान-सहान अभ्यासक्रमदेखील उपयुक्त ठरत आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानांतर्गतील संगणकांची तांत्रिक माहिती आणि तंत्र हे रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानात करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयात चांगले गुण मिळवणे गरजेचे आहे. 

संगणकावर आधारित काही प्रमुख करिअर

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग : कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगला विशेष महत्त्व आहे. हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. या आधारावरच तंत्रज्ञानाचे ज्ञान जिवंत आहे. कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग हा एकप्रकारचा कोडिंग प्रोग्रॅम आहे. कोणताही प्रोग्रॅम तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या संगणकीय भाषांचा प्रयोग केला जातो. कोडिंग माध्यमातून कॉम्प्युटर प्रोग्रॅम तयार करण्याच्या पद्धतीलाच कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग असे म्हटले जाते. विशेष म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या सुरुवातीला असेम्ब्ली, सी. जावा, स्क्रिप्ट, ओरॅकल, डॉस आदी भाषांची माहिती दिली जाते. कोणताही प्रोग्रॅम तयार करताना या भाषेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना फ्रंटएंड तसेच बँकएंड म्हणजेच स्टोअरेजच्या पद्धतीचेदेखील आकलन केले जाते. फ्रंटएंड हे प्रोग्रॅम मॉनिटर स्क्रीनवर विंडोजप्रमाणे चालवले जाते. तर बॅकएंड प्रोग्रॅम केवळ बोर्डच्या माध्यमातून संचलित केले जाते.

कॉम्प्युटरची कोणतीही भाषा शिकण्यासाठी संगणकाची बेसिक माहिती घेणे गरजेचे आहे. सर्वात अगोदर बेसिक अ‍ॅप्लिकेशनचे ज्ञान भरपूर असणे गरजेचे आहे. उदा. एमएस ऑफिस, इंटरनेट, ई-मेल, कॉम्प्युटरशी निगडित सिद्धांत आदी. त्यानंतर इनपुट-आऊटपुट डिव्हाईस, त्याचा वापर करणे, डेटाचे ज्ञान, अंकगणितीय ज्ञान आणि कामगिरी, पुनरावृत्ती आदींचे आकलन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे. प्रोग्रॅम तयार करताना त्याचे कोड, संकलन, दस्तऐवज तयार करणे, एकीकरण, देखभाल गरजांचे विश्लेषण, सॉफ्टवेअर, वास्तुकला, सॉफ्टवेअर परीक्षण करता येणे गरजेचे आहे.

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी दोन प्रकारचा अभ्यास करावा लागेल. पहिले म्हणजे तांत्रिक पदवी प्राप्त करणे आणि दुसरे म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये डिप्लोमा करणे. कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या विपुल संधी आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना बेरोजगार म्हणू शकत नाहीत. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर, कॉम्युटर टिचर, प्राध्यापक, सॉफ्टवेअर इंजिनिअर आदी होऊ शकतात. तसेच ते स्वत:चे सायबर कॅफे आणि कोचिंग सेंटरही सुरू करू शकतात. ते आऊटसोर्सिंग करून आपली सेवा प्रदान करू शकतात. 

कॉम्प्युटर हार्डवेअर, रिपेअरिंग आणि नेटवर्किंग इंजिनिअरिंग :  सध्याच्या काळात संगणकाचा उपयोग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजच्या काळात संगणक हा आपला अभिन्न अंग बनला आहे. बँक, रेल्वे, विमा आणि अन्य शासकीय अशासकीय तसेच खासगी उपक्रमात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे. म्हणूनच कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. संगणक क्षेत्रातील क्रांतीमुळे जसे की इंटरनेट, मोबाईल फोन, एटीएम, कॉल सेंटर आदी कारणांमुळे कॉम्प्युटरच्या अनेक महत्त्वपूर्ण भागांची सुधारणा करण्यासाठी कौशल्यप्राप्त कॉम्प्युटर हॉर्डवेअर इंजिनिअरची गरज नेहमीच भासते. हार्डवेअर आणि नेटवर्किंग इंजिनिअरिंग क्षेत्रात रोजगारांच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात रोजगारासाठी इच्छुक विद्यार्थी कॉम्प्युटर हार्डवेअर रिपेअरिंग आणि नेटवर्किंग क्षेत्राची निवड करू शकतात. 

कॉम्प्युटर मल्टिमीडिया : मल्टिमीडिया हे एक बहुआयामी तंत्रज्ञान आहे. या आधारावर दळणवळणाचे विविध माध्यम जसे की ऑडिओ, व्हिडीओ, टेक्स्ट, ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशन, कलर्स आदींचा वापर कॉम्प्युटरच्या माध्यमातून एकाचवेळी केला जातो. आज अ‍ॅनिमेशन आधारित ‘द जंगलबुक’सारख्या हिट चित्रपटांचा बोलबाला आहे. मोबाईल गेमिंगमध्ये मल्टिमीडियाने धुमाकूळ घातला आहे. या क्षेत्रातील रचनात्मक विचार बाळगणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराची विपुल संधी आहे. दहावीनंतर मल्टिमीडियाचा अभ्यासक्रम करता येऊ शकतो.

याशिवाय कॉल सेंटर आणि आऊटसोर्सिंग, स्टॉक मार्केटमध्ये संगणकाचा वापर, देश-विदेशातील भाषांचे अनुवादक, मेलिंग सर्व्हिस, टॅक्स रिटर्न सेवा, बुक इंडेक्सिंग, डेक्सटॉप पब्लिशिंग, प्रोग्रॅम/पॅकेजिंग डिस्ट्रिब्युटर, कॉम्प्युटरने सल्ला देणे, डेटा एंट्री सेवा, कॉम्प्युटर कौन्सिलिंग, इलेक्ट्रॉनिकशी निगडित बुक किंपिंग सर्व्हिस, कॉम्प्युटरवर भविष्यवाणी, ब्रोशर्श तयार करणे, आदी सेवांसाठी संगणकाचा वापर केला जात आहे. 

रोजगाराच्या संधी

राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या देश-विदेशातील संस्थांत कॉम्प्युटर तज्ज्ञांना नेहमीच मागणी राहिली आहे. शाळा आणि कॉलेजमध्येदेखील अध्यापक म्हणूनही चांगली संधी उपलब्ध होत आहे. भारतीय लष्करातही अधिकारी होण्याची इच्छा असेल, तरीही संधी विपुल आहेत.