Wed, Aug 12, 2020 13:00होमपेज › Vishwasanchar › लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्यास ‘या’ देशात 5 कोटींचा दंड!

लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्यास ‘या’ देशात 5 कोटींचा दंड!

Last Updated: Mar 25 2020 9:07PM
नवी दिल्‍ली :

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्या देशात 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही अनेकांना त्याचे गांभीर्य समजत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. अन्य देशांमध्ये मात्र लॉकडाऊन इतका कडक आहे की, बाहेर पडल्यास लोकांना दंड म्हणून जबर रक्‍कम द्यावी लागते. स्पेन हा असा देश आहे जिथे लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर पडल्यास तब्बल 5 कोटी रुपयांचा दंड होतो!

जगातील अनेक देशांमध्ये सध्या वेगवेगळ्या कालावधीसाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये इजिप्तचाही समावेश आहे. तिथे सध्या दोन आठवड्यांचा लॉकडाऊन आहे. सरकारने या काळात घराबाहेर पडणार्‍या लोकांसाठी 4 हजार इजिप्शियन पौंड म्हणजेच सुमारे 19,594 रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीतही आता दंडाची रक्‍कम वाढवण्यात आली आहे. तिथे अशा लोकांवर 3 हजार युरो म्हणजेच सुमारे 2.47 लाख रुपयांचा दंड आहे. स्पेन हा देश याबाबतीत सर्वात कडक पावले उचलणारा देश ठरला आहे. स्पेन सरकारने 14 मार्चलाच लॉकडाऊनची घोषणा केली होती. तिथे घराबाहेर पडणार्‍या लोकांना पहिल्या खेपेस 601 युरो म्हणजेच सुमारे 50 हजार रुपयांचा दंड होतो. मात्र, हा दंड होऊनही संबंधित व्यक्‍ती दुसर्‍यांदा घराबाहेर आढळली, तर त्याला 6 लाख युरो म्हणजेच सुमारे 5 कोटी रुपयांचा जबर दंड होतो. आतापर्यंत स्पेनमध्ये 30 हजार लोकांना दंड झालेला आहे.