Wed, Jan 20, 2021 20:57
थंडीने केली कुत्र्या-मांजरात दोस्ती!

Last Updated: Jan 12 2021 10:22PM
नवी दिल्‍ली : जीव कोणत्याही प्रजातीचा असो, त्याला हिवाळा, पावसाळा किंवा उन्हाळ्याची बाधा कमी-जास्त प्रमाणात होतेच. सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे आणि अशा थंडीने एरवी विळ्या-भोपळ्याचे नाते असलेल्या कुत्रा आणि मांजर यांच्यामध्ये दोस्ती घडवली आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

मांजराच्या पाठीमागे भुंकत धावणारा कुत्रा ही काही नवलाईची गोष्ट नाही. ‘टॉम अँड जेरी’मधील टॉमच्या पाठीमागे धावत असलेल्या बुलडॉगची आठवण यावी, अशीच ही स्थिती असते. मात्र, या व्हिडीओमध्ये शेगडीसमोर ऊब घेत शांतपणे  खेटून बसलेल्या कुत्र्याचे पिल्‍लू व मनीमाऊचे द‍ृश्य दिसते. ही शेगडी म्हणजे एक छोटे तंदूर आहे. त्यामधील आगीमुळे मिळणारी ऊब या कुत्र्याला आणि मांजराला दोघांनाही हवी होती व त्यामुळे परस्परांमधील वैर बाजूला ठेवून दोघेही ऊब घेत बसले! हा व्हिडीओ भारतीय वन विभागातील अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. ‘हे दोघे स्वतःला ऊब देत आहेत आणि आमच्या हृदयालाही!’ अशी कॅप्शन त्यांनी जोडली आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओवर भन्‍नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाच लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे.