Tue, Oct 20, 2020 10:50होमपेज › Vishwasanchar › कोरोना लस तयार झाली की दहा वर्षे राहील प्रभावी

कोरोना लस तयार झाली की दहा वर्षे राहील प्रभावी

Last Updated: Oct 19 2020 1:20AM
नवी दिल्ली : जगभरात हाहाकार माजवत असलेल्या कोरोना विषाणूमध्ये ‘म्यूटेशन’ (उत्परिवर्तन) होत असले तरी यावर लस तयार झाल्यास ती किमान पुढील 10 वर्षे प्रभावी असेल. आयसीएमआरचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी कोरोनामधील या म्यूटेशनला ड्रिफ्ट (किरकोळ परिवर्तन) असे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, कोरोनावर एकदा का लस तयार झाल्यास या विषाणूत किरकोळ बदल होत गेले तरी त्यास ही लस जुमानणार नाही. तसेच ही लस कोरोनाला रोखण्यास पूर्णपणे समर्थ असेल.

दरम्यान, येत्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना व्हॅक्सिन उपलब्ध होईल आणि जुलैपर्यंत देशातील सुमारे 30 कोटी जनतेला याचा लाभ मिळवून देण्याची तयारी सरकार करत आहे. डॉक्टर बलराम भार्गव यांच्या मते, कोणत्याही व्हायरसमधील ‘म्यूटेशन’ ही एक सामान्य प्रक्रिया आहे. वेळेनुसार व्हायरसमध्ये लहान-मोठे बदल होत असतात. गेल्या जानेवारीत कोरोना विषाणू आढळल्यानंतर त्याच्यात अनेक देशांमध्ये उत्परिवर्तन झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, हे ‘म्यूटेशन’ इतके मोठे नाही की, भविष्यात विकसित करण्यात येणार्‍या लसीचा प्रभाव कमी करेल. कोरोनात म्यूटेशन होत असले तरी व्हॅक्सिनच्या प्रभावीपणावर कोणताच परिणाम होणार नाही.

डॉक्टर भार्गव यांच्या मते, कोरोना परिवारातील यापूर्वीच्या व्हायरसच्या संशोधनामधून स्पष्ट झाले आहे की, या व्हायरसमध्ये पूर्णपणे बदल होण्यास किमान 10 वर्षांच्या कालावधी लागतो. या म्यूटेशनला ‘शिफ्ट’ असे म्हणतात. शिफ्टमध्ये व्हायरस पूर्ण बदलतो आणि जुन्या व्हायरसपेक्षा तो पूर्णपणे वेगळा असतो. त्यानंतरच आताची लस या नव्या व्हायरसवर प्रभावी ठरणार नाही. त्यावेळी नवी लस तयार करावी लागेल.

 "