Fri, Jul 10, 2020 02:37होमपेज › Vidarbha › आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा ‘मूड’ आक्रमक

आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा ‘मूड’ आक्रमक

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 11 2017 7:15AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

सोमवार 11 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणारेे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि शेतकरी आत्महत्या आणि राज्यातील खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक राहतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी अधिवेशनापूर्वीच कर्जमाफीपोटी सुमारे 19 हजार कोटी रुपये बँकांकडे पाठविले आहेत.

विरोधकांची डल्लामार यात्रा : मुख्यमंत्री

नागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्यात विरोधक सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करत आहेत. मात्र, सत्तेत असताना त्यांच्या तिजोरीवरील डल्लामारचे पुरावे सभागृहासमोर सादर करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विरोधकांनी काढलेली यात्रा ही हल्लाबोल नव्हे, तर डल्लामार यात्रा होती, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन केले. 

पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने कर्ज घेतले आहे. सरकार विकास कामांना कात्री लावणार नाही. त्यामुळे राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची काळजी विरोधकांनी करू नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

विरोधक अजूनही तीन वर्षांपूर्वीच्या सैराट सिनेमावरच अडकले आहेत. त्यांना नव्या सिनेमांची नावे सांगा, असा टोलाही त्यांनी लगावला. विरोधकांमधील नेत्यांचा फरार नेते असाही उल्लेख त्यांनी केला. आतापर्यंत 41 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, 21 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी, तर 12 लाख शेतकर्‍यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. 19 विधेयके अधिवेशनाच्या पटलावर मांडणार आहोत. नाना पटोले यांना त्यांची चूक कळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य दिवाळखोरीकडे : विरोधक

नागपूर : चंदन शिरवाळे

राज्य सरकारकडे विकास कामांसाठी निधी नाही. विकास कामांच्या निधीला कट मारलेला पैसा शेतकर्‍यांच्या कर्जमाफीकडे वळवला जात आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने सरकारी कर्मचार्‍यांची शेकडो पदे रद्द करण्याचा घाट घातलेल्या या सरकारची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे, असा आरोप करत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.

सरकारने आतापर्यंत साडेचार लाख कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी घेतले, आतापर्यंत पंधरा लाख शेतकर्‍यांना कशाप्रकारे कर्जमाफी दिली, याचा विरोधकांनी सरकारकडे हिशेबच मागितला. यावरून हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झाले. विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. विखे- पाटील यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले,  गेल्या तीन वर्षांत या सरकारने जनतेला फसवले आहे . कोट्यवधी रुपये खर्चून न झालेल्या कामांचाही सरकारकडून ढोल पिटला जात आहे.

 मी या सरकारचा लाभार्थी या जाहिरातबाजीवर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत; पण या सरकारचे केवळ दोनच लाभार्थी आहेत, एक भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे, अशा शब्दांत विखे-पाटील यांनी सरकारची खिल्ली उडवली.

गेल्या तीन वर्षांत दहा हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि 67 हजार बालमृत्यू  झाले आहेत. मंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांवर शेतकर्‍यांचा भरोसा राहिला नाही. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून तारीख पे तारीख मिळत आहे. विरोधी पक्षाला घाबरून सरकारने रविवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत सरकारने आतापर्यंत कर्जमाफी दिलेल्या शेतकर्‍यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हानही विखे यांनी दिले. शेतकर्‍यांना गोळ्या घालण्याचे समर्थन करणारे हे सरकार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गरज पडल्यास सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे सांगत फिरत आहेत; पण गरज नेमकी कुणाची शिवसेनेची की जनतेची, असा सवालही त्यांनी ठाकरे यांना विचारला. विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही राज्यात दीड हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असल्याचे सांगितले. हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने आपण  फिरत आहोत; पण आतापर्यंत एकाही शेतकर्‍याने आपली कर्जमाफी झाली, असे सांगितले नाही.

या कर्जमाफीची खरी लाभार्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय व्यक्तीच्या इनोविव्ह कंपनी आहे, असा आरोप मुंडे यांनी केला.

अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या  शेतकर्‍यांना  एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सरकार म्हणजे ऑनलाईन भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. आम्ही अनेक घोटाळे सभागृहात मांडले,  पुरावेही दिले; पण सरकार घोटाळेबाज मंत्र्यांना क्लीन चिट देत आहे.गुजरातमध्ये जसा विकास वेडा झाला, तसा महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी, या सरकारला शासन चालविता येत नसल्याचा आरोप केला. मोठमोठ्या घोषणा करणार्‍या या सरकारने विकास कामांवर किती खर्च केला, हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात कळेल. यावरून हे सरकार जनहिताचे आहे काय हे उघड होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जयंत पाटील,  शेकाप नेते  जयंत पाटील, नवाब मलिक यावेळी उपस्थित होते.