Wed, Nov 13, 2019 07:32
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › चंद्रपूर : अखेर 'त्या' पट्टेदार वाघाचा मृत्यू (video)

चंद्रपूर : अखेर 'त्या' पट्टेदार वाघाचा मृत्यू (video)

Last Updated: Nov 07 2019 9:14AM
नागपूर : पुढारी ऑनलाईन

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील शिवना नदी पात्रात दगडांच्या फटीत अडकलेल्या त्या वाघाचा अखेर मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या बचाव पथकाकडून या वाघाला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

सदर वाघाने पुलावरून उडी मारल्याने तो जखमी झाला होता. शिवना नदी पात्रात हा वाघ अडकून पडला होता. यामुळे वाघाला दुखापत झाली होती. या वाघामुळे गेल्या काही दिवसांपासून कुनाडा, चारगाव, देऊरवाडा भागात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. 

चारगाव (सातपुते) येथील तेलवासा खाणीजवळ एका शेतकऱ्याच्या शेताजवळ या वाघाने याआधी बैलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला होता. हा वाघ पुलावरून उडी मारून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना तो शिवना नदीतील दगडांच्या फटीत अडकला. यामुळे त्याच्या कमरेला मार लागला. वाघ नदीपात्रात अडकला असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाघाला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याचा अखेर मृत्यू झाला आहे.

वाघ ज्या ठिकाणी अडकला होता; तेथे जाणे अवघड होते. वाघाजवळ जाण्यासाठी मार्ग नसल्याने वन विभागाने क्रेनची मदत घेतली. क्रेनला पिंजरा बांधून ती नदीपात्रात सोडला होता. मात्र, वाघ जखमी झाल्यामुळे त्याला चालता येत नव्हते. काहीवेळानंतर त्याने हालचाल करुन स्वतःची सुटका करुन घेतली. मात्र त्याला चालता येत नसल्याने तो फसला. काल उशीर झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले होते. आज सकाळी बचावकार्य सुरू करण्यापूर्वीच वाघाचा नदीपात्रात मृत्यू झाला.