Sun, Jul 05, 2020 15:33होमपेज › Vidarbha › ब्लॉग : लिहिते राहा, व्यक्त होत राहा...

ब्लॉग : लिहिते राहा, व्यक्त होत राहा...

Published On: Feb 17 2018 9:52AM | Last Updated: Feb 17 2018 9:51AMबडोदा : प्रतिनिधी

बडोदे येथे सुरू असणार्‍या 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या भाषणातील हा काही वेचक भाग...

मित्रहो, मूलत: मी एक सर्जनशील ललित लेखक आहे. कथा व कादंबरी हे माझं अभिव्यक्तीचं मुख्य माध्यम आहे. मी स्वत:ला सामाजिक प्राणी समजतो व माझी नाळ सदैव माणसाच्या दु:खवेदनेशी जोडली गेलीय असं वाटतं. खरं तर, टॉलस्टॉयनं म्हटल्याप्रमाणे, सुखाच्या, आनंदाच्या आज एकविसाव्या शतकातलं जग स्फोटक बनलं आहे. गरिबी, मूल्यांचा र्‍हास, दहशतवाद, क्रौर्य आणि सत्तेमुळे होणारी दडपशाही यामुळे सामान्य माणूस निराश, हतबल व कुंठित झाला आहे. त्याला स्वर देत आत्मभान मला देता येईल का व त्याचा जगण्याचा विश्‍वास अंशमनाने का होईना वाढवता येईल का, हा माझा सततचा प्रयत्न राहिला आहे. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं, तर इंडिया विरुद्ध भारत हा संपन्नता विरुद्ध अभाव, विकृतीच्या टोकापर्यंत पोचलेला सुखभोग विरुद्ध भूक, बेकारी आणि आत्महत्येपर्यंतची निराशा व संपलेपणाचा विषम संघर्ष आहे.  

तो आपल्या लेखनातून प्रकट होताना वाचकांना मी काय देऊ शकतो, याचं मी सातत्यानं भान बाळगत आलो. तसेच ‘हॅव नॉट’ म्हणजेच ‘नाही रे’ वर्गाची बाजू घेत त्यांच्या कथा लिहिणे हीपण माझी एक स्वाभाविक प्रेरणा आहे. तसेच ते विचारपूर्वक बनवलेले तत्त्वज्ञान आहे. मात्र, त्यासाठी कोणताही एक ‘इझम’ वा तत्त्वज्ञान हा मानवी कल्याणाचा अक्सीर रामबाण इलाज आहे, असे मी मानत नाही. माझा असेल इझम तर तो नि:संशयपणे निखळ मानवतावाद आहे.

मी स्वत:तला आजच्या काळाचा म्हणजेच समकालीन लेखक मानतो. जेव्हा टीकाकार मला समकालीन लेखक म्हणतात, ती माझ्यासाठी सकारात्मक कॉम्प्लिमेंट आहे, असे मी मानतो. हे माझ्यासाठी सहजतेनं घडत गेलं असं वाटतं. मराठी वाचकांना पुराण-इतिहासात रमायला आवडतं. राजकीय नेते हे जाणून मतपेटीसाठी ‘पुनरुज्जीवनवादा’ला उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जुन्या काळचे व त्या काळच्या नायकांना देवत्व बहाल करणारे ‘पोलिटिकली करेक्ट’ लेखन बरेच होत आहे. दुसरा लेखनाचा प्रकार म्हणजे ‘नॉस्टॅल्जिक’ होत गेलेल्या लेखनाचा.मला वाटतं की, मराठी माणूस अजूनही भूतकाळात जास्त रमतो; पण माझी स्मरणरंजनाची व इतिहास-पुराणात रमण्याची वृत्ती नाही. त्यामुळे त्यापासून मी बचावलो आहे. मी भूतकाळात रमणारा लेखक नाही, तसेच विज्ञानकथा लेखकांप्रमाणे भविष्याचा वेध घेणारा लेखक नाही. खर्‍या अर्थाने वर्तमानात जगणारा व आजच्या काळाचं प्रॉडक्ट असलेला मी एक माणूस व एक लेखक आहे. 

साहित्य हे समाजातून माणसाचं दु:ख, शोषण, व्यथा-वेदना आणि समाज व्यवस्थेतलं त्याचं पिचलं जाणं आणि धर्म-राजकारण-सत्तेसोबतचा संघर्ष आदीं जीवनद्रव्यं घेतो आणि आपल्या प्रतिभेनं त्याची पुनर्रचना करून समाजापुढे आरशासारखा ठेवतो. थोडक्यात, साहित्य हे एका अर्थाने समाजाचं जीवनसत्त्व असतं, जो समाज हे सत्त्व जागरूकतेनं व नीर-क्षीर विवेकी न्याय लावून टिपतो आणि मनात रूजवून घेत विचार करतो व प्रश्‍न विचारू लागतो, तो समाज निरोगी व प्रगतिशील राहतो. जेव्हा समाज आणि साहित्याची नाळ तुटते, तेव्हा असा समाज हा शबल, हतबल व एका अर्थानं कुरूप होत जातो. 

ही त्या समाजाच्या अध:पतनाची सुरुवात असते. कारण, तो साहित्यातून संवेदनशीलता घेत नसल्यामुळे मूक-बधिर झालेला असतो; पण हीच वेळ असते व हाच काळ असतो, जेव्हा लेखकांनी-कलावंतांनी अधिक जबाबदारीनं लेखन करून समाजाचा आवाज बनावा, त्याचं आत्मभान जागृत करावं आणि त्याला दिलासा द्यावा की, त्याचं दु:ख, त्याचं शोषण एक ना एक दिवस संपणार आहे. मूलत: लेखक हा मानवी दु:खाचीच कहाणी सांगत असतो.

कारण, त्याचं नातं हे दु:खाशी व वेदनेशी असतं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे भारतीय संविधानाचं तत्त्वज्ञान आहे, ते साहित्याचंपण असलं पाहिजे. कारण, माणूस महत्त्वाचा, त्याचं जगणं; ते ही सन्मानानं जगणं महत्त्वाचं आहे; पण देश कोणताही असो, तेथील व्यवस्था मग ती धर्माची असो, विचारसरणीची असो,शासन-प्रशासनाची असो किंवा अर्थकारण संस्कृतीची असो, ती मूठभर माणसांच्या हाती सत्ता केंद्रित करत जाते, हा सार्वत्रिक इतिहास आहे. त्यामुळे बहुसंख्य सामान्य माणसांना ही व्यवस्था पुरेसा न्याय देत नाही. उलटपक्षी, त्याचं शोषण करते व त्यांना मानवी प्रतिष्ठा व सन्मानाचं जगणं नाकारते.... हेच मानवी दु:ख, वेदना आणि दबलेपणाचं-पिचलेपणाचं मूळ आहे. त्याला आवाज देणे, ते शब्दबद्ध करणे, हेच तर साहित्याचं सामाजिक प्रयोजन आहे. 

एकेक शेतकर्‍याचं जगणं आणि एकेक शेतकरी आत्महत्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे की, तुमची धोरणं व विकासनीती आमच्यासाठी कामाची नाही.... या सार्‍यांवर अनेक लेखक-कवींनी हृदय पिळवटून टाकणारं लिहिलं आहे, मीही लिहिलं आहे..... आज मला सत्ताधारी पक्ष व शासनाला हा सवाल करायचा आहे, की आपण जागे कधी होणार? किती काळ आपण असा अंत पाहाणार आहात शेतकर्‍यांचा? दंडकारण्य भागात आदिवासींवर अन्यायाची परिसीमा झाली, म्हणून त्यातून नक्सलवाद जन्मला.... आपल्याला हे शेतकर्‍यांच्या संदर्भात परवडणारं नाही. शेतकरी सोशिक आहे, त्याचं काळ्या आईवर प्रेम आहे व न परवडणारी शेती करीत तो देशाचं पोट भरत आहे. सबब आपण समाज व सरकार त्यांचं जगणं कसं सुखाचं करणार आहोत, हा या घडीचा कळीचा प्रश्‍न आहे. तो मला आज या मंचावरून सरकारला व समाजाला विचारायचा आहे. हे राजकीय भाष्य समजू नका; पण एक कलावंत म्हणून मी शेतकरी-कष्टकर्‍यांच्या दु:खाशी आयडेंटिफाय करतो - तो माझा धर्म आहे. त्यांना स्वर देणं, त्यांचा आवाज बुलंद करणं ही आमची कमिटमेंट आहे.

 आज देशात धर्म व विश्‍वासाच्या संदर्भात जे उन्मादी वातावरण आहे, त्यावर गांधी विचार हा अक्सीर अशा रामबाण उपाय आहे. मद्रास हायकोर्टानं ट्रोलिंगला कंटाळून लेखक म्हणून स्वत:ला मृत घोषित करणार्‍या तामिळ लेखक पेरूमल मुरूगन याला जिवंत करीत ‘लिहित राहा’ असं अभय देणारं निकालपत्रच दिलं, त्या निकालपत्राचं हे भरतवाक्यासारखं शेवटचं वाक्य मी आपणास आज लेखक - कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो संकोच ‘नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स’ किंवा ‘फ्रींज एलेमेंट्स’ करीत आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर सांगू इच्छितो. मद्रास हायकोर्टानं केवल पेरूमल मुरूगनलाच नाही, तर तमाम भारतीय लेखकांना ‘लिहिते राहा - व्यक्त होत राहा’ असं एकप्रकारे अभय दिलं आहे, त्याचा आपण फायदा करून घेत निर्भयपणे जे खुपतं, व्यक्त करावंसं वाटतं, ते स्पष्टपणे लिहिलं पाहिजे - व्यक्त केलं पाहिजे. तथाकथीत संस्कृतिरक्षक व अगदी सौम्य टीका-टिप्पणीनंही दुखावल्या जाणार्‍या मूठभरांच्या झुंडशाहीपुढे आपण मान न तुकवली पाहिजे. कारण, संविधानाचे कवचकुंडल कलम 19 द्वारे आपल्याला मिळाले आहे. ते आपण केवळ जपलंच नाही, तर निर्भीडपणे वापरलंही पाहिजे.