Sat, Dec 07, 2019 11:30होमपेज › Vidarbha › ..तर संभाजी भिडेंवर कारवाई : मुख्यमंत्री

..तर संभाजी भिडेंवर कारवाई : मुख्यमंत्री

Published On: Jul 09 2018 1:17PM | Last Updated: Jul 09 2018 1:32PMनागपूर : पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्र सरकार हे ज्ञानोबा, तुकोबांच्या विचारांशी बांधील आहे. सरकार मनूचे समर्थन करत नाही. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्‍तव्याची व्‍हिडिओ क्‍लिप तपासली जाणार असून त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोधकांनी विधान सभेत भिडे गुरुजींच्या वक्‍तव्यावर सरकारची भूमिका स्‍पष्‍ट करण्याची मागणी लावून धरली. यावर मुख्यमंत्र्यांनी स्‍पष्‍टीकरण दिले. 

संभाजी भिडे यांनी मनूचे समर्थन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याविरोधात समाज माध्यमांवरून टीका होत होती. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही याप्रकरणी सरकारने भूमिका स्‍पष्‍ट करण्याची मागणी केली होती. 

दरम्यान, ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनू एक पाऊल पुढे होता, या संभाजी भिडे यांच्या विधानाशी सरकार सहमत नसेल तर त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी आणि सहमत असेल तर सभागृहात ठराव मांडून मनुस्मृतीला भारतीय संविधानापेक्षा श्रेष्ठ जाहीर करावे, अशी उपरोधिक मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे-पाटील यांनीही केली होती.