Sun, Feb 28, 2021 07:03
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी थांबवा- संजय राठोड

Last Updated: Feb 23 2021 2:21PM

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भाोवऱ्यात असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज मंगळ‍वारी अखेर मौन सोडले. ‘चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझे कुटुंब सहभागी आहे. पण या प्रकरणावरुन घाणेरेडे राजकारण केले जात असून हे खूप चुकीचे आणि निराधार आहे, ’ असा खुलासा संजय राठोड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. त्यांनी यावेळी आपल्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

वाचा : संजय राठोड यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते रस्त्यावर; राठोड अजूनही विरोधकांच्या रडारवर!

माझे राजकीय जीवन उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर जे काही आरोप लावले जात आहेत त्यात तथ्य नाही. चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे. पोलीस तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल, असा दावा त्यांनी केला.

कृपा करुन माझ्या कुटुंबांची आणि समाजाची बदनामी थांबवा, असे आवाहन त्यांनी केले.

वाचा : संजय राठोड आज सर्वांपुढे येणार; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मौन सोडणार? 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले. या प्रकरणी त्यांनी आज सर्व आरोप फेटाळून लावले. पूजा चव्हाणच्या मृत्यनंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर दुसरीकडे सुरू असलेली नाहक बदनामी थांबवा या मागणीसाठी समाजबांधव व समर्थकांकडून जिल्हाभरात मोर्चे काढले जात आहेत.

वाचा : शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण का हवेत?

दरम्यान, आज संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे येऊन कुटुंबासह देवीचं दर्शन घेतले. त्यांच्या समर्थनासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक रस्त्यावर उतरलेले. समर्थकांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला. येथे कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. 

वाचा : कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करून काॅंग्रेस ठरवतंय पक्षवाढीची रणनिती