Wed, Apr 01, 2020 07:15होमपेज › Vidarbha › अकोला : प्रहार जनशक्ती संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षांचा गोळीबारात मृत्यू

अकोला : प्रहार जनशक्ती संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षांचा गोळीबारात मृत्यू

Last Updated: Feb 28 2020 2:01AM
अकोला: पुढारी प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट येथे शुक्रवारी उशीरा रात्री गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या तुषार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अकोट शहर पोलीस ठाण्याच्या मागील पोलीस वसाहतीत हा गोळीबार झाला. गोळीबार करून मारेकरी तेथून पसार झाले. तुषार पुंडकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रात्री १२च्या सुमारास अकोला येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुंडकर यांच्या पाठीत दोन गोळ्या लागल्या. पाठीत गोळ्या घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

गोळीबारात प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने पुंडकर यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने धोक्यात असल्याची माहिती डॉक्टरांनी काल रात्रीच दिली होती. पुंडकर यांना वाचविणासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केलेमात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

अकोट पोलिस वसाहतीनजीक रात्री पुंडकर आले असता काहीजण त्यांच्या मागावर असल्याचा त्यांना संशय आला म्हणून ते पोलिस वसाहतीच्या दिशेने वळले. मात्र मारेकऱ्यांनी पोलिस वसाहतीत शिरून ते पळत असताना त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. यात त्यांना दोन गोळ्या पाठीत लागल्या. दरम्यान अकोटमध्ये पोलिसा़ंचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रहार जनशक्तीचे संस्थापक आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी तातडीने अमरावती दौरा अर्धवट सोडून अकोल्याकडे धाव घेतली. सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांनी रूग्णालयात गर्दी केली होती. याबाबत अधिक तपास सुरू असून पोलीस वसाहतीतच गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणात मारेकरी कोण आहे याचा अद्याप सुगावा लागला नाही.

तुषार पुंडकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना आमदार नितीन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी रुग्णालयात धाव घेवून जखमीच्या प्रकृतीची पाहणी केली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरही रात्री रुग्णालयात पोहचले. तुषार पुंडकर यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षकसही रुग्णालयात उपस्थित होते. रात्री उशिरा पोलिस अधीक्षकही रुग्णालयात दाखल झाले. प्रहारचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने रुग्णालयात उपस्थित होते.