Sun, Jul 12, 2020 18:29होमपेज › Vidarbha › धनंजय मुंडेंमुळेच संघर्ष करावा लागला : पंकजा

धनंजय मुंडेंमुळेच संघर्ष करावा लागला : पंकजा

Published On: Jul 13 2018 12:59PM | Last Updated: Jul 13 2018 2:17PMनागपूर : दिलीप सपाटे

भाऊ असूनही मला धनंजय मुंडे यांच्यामुळे जीवनात संघर्ष करावा लागला. मी या संघर्षातून माझे नेतृत्व सिध्द करून बाहेर पडले. आता माझा संघर्ष संपला असून धनंजय मुंडे यांचा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. मला केवळ ओबीसी नाहीतर जातीपातीच्या पुढे जाऊन राज्याचे नेतृत्व करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर येथे पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या पत्रकारांशी सुयोग निवासस्थानी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी आपल्याला मंत्री करेल म्हणून धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडला. मात्र राष्ट्रवादीने काही त्यांना मंत्री केले नाही. मात्र मी मंत्री झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते बनविण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही धनंजय मुंडे यांना आपल्यामुळेच मिळाले, असा टोला पंकजा मुंडे यांनी लागावला. 

धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडल्यापासून त्यांच्याशी कोणतेही कौटुंबिक सबंध राहिलेले नाहीत. ज्यावेळी गोपीनाथ मुंडे गेले त्यावेळी मोठा भाऊ म्हणून धनंजय मुंडे यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवायला हवा होता. असे झाले असते तर कदाचित आज वेगळे चित्र असते. पण ते माझ्या विरोधात निवडणूक लढले. त्यांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप करून मला त्रास दिला. पण त्या आरोपातून मी तावूनसुलाखून बाहेर पडले. या काळात माझा पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आता माझा राजकीय संघर्ष संपला असून धनंजय मुंडे यांचा संघर्ष सुरू झाला असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

राज्यात ओबीसी चळवळ शांत झालेली नाही किंवा ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो असे मला वाटत नाही. नजीकच्या काळात ओबीसींचे नवीन नेतृत्व हे पुढे आलेले दिसेल. त्यात आपणही असू. पण मला जातीपातीच्या पलीकडे जाऊन राज्याचे नेतृत्व करायचे आहे, असे त्या म्हणाल्या.

मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला पाठिंबा 

मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी राज्याचा कारभार केला. मात्र आपल्या हातात काहीही पडले नाही अशी भावना मराठा समाजात झाली आहे. गरीब मराठा समाजाला ओबीसींच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास पाठींबा असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या मंत्रिपदाला आपण विरोध केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्याची 'चव' ठेवली नाही असेही त्या म्हणाल्या.

भगवान गडाला मी मुक्त केले

गोपीनाथ गडाची निर्मिती करून मी काही भगवान गडाला आव्हान दिलेले नाही. हे एका मुलीने वडिलांचे बांधलेले स्मारक आहे. भगवान गड हा भक्ती तर गोपीनाथ गड शक्तीगड आहे. हा गड निर्माण करून मी उलट भगवान गडाला माझ्यापासून मुक्त केले, असे उद्‍गार पंकजा मुंडे यांनी काढले.