Mon, Jul 06, 2020 23:57होमपेज › Vidarbha › यवतमाळमधून भरपाईसाठी सव्वा लाख शेतकऱ्यांचे अर्ज 

यवतमाळमधून भरपाईसाठी सव्वा लाख शेतकऱ्यांचे अर्ज 

Last Updated: Nov 11 2019 1:34AM

अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे, नुकसान भरपाईसाठी सव्वा लाख अर्ज आले आहेत.यवतमाळ : प्रतिनिधी

परतीच्या  पावसाने खरिपातील  पिकांच्या नुकसानीचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. विमा कंपनीने घालून दिलेल्या ७२ तासाच्या मुदतीत संपूर्ण जिल्हाभरातून एक लाख २१ हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर केले आहेत. यातील केवळ सात हजार अर्जांवर पंचनामे झाले आहेत. शेत शिवारात चिखलामुळे पंचनाम्याची गती मंदावली आहे.   

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उद्धवस्त झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर , ज्वारी आदी हाताशी आलेली पिके पावसामुळे मातीत मिळाली असून नुकसानीचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आत्तापर्यंत तो अडीच लाख हेक्टरवर गेला असून त्यात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. जसजसे पंचनामे पूर्ण होतील. तसे किती नुकसान झाले कळण्यासाठी प्रशासनाने पंचनाम्‍याचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर जाहीर  होणार्‍या आकडेवारीची  वाट पहावी लागणार आहे.

नुकसान  झालेल्या  विमाधारक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानुसार आत्तापर्यंत एक लाख २१ हजार १९८ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत.  यातील ६ हजार ९११  शेतकर्‍यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यांच्या नुकसानीचा आकडा १८ कोटी सतरा लाख  ९७ हजार रुपयांच्या घरात आहे. जसे पंचनामे पूर्ण होतील तसा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत  पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव  या चार तालुक्यांतून सर्वाधिक एकाहत्तर हजार हजार ६७४  शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. तर यवतमाळ, कळंब, राळेगाव व घाटंजी या चार तालुक्यातून पाच हजार १७१ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज देण्यासाठी अजूनही शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेत असल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल झालेल्या संख्येच्या तुलनेत पंचनाम्याची गती मंदावली आहे. सततच्या पावसाने  शेत शिवारात  झालेल्या चिखलामुळे  शेतात जाण्यासाठी  मोठी अडचण होत आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण करण्यासाठी आणखी आठ दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.    

 तालुका निहाय प्राप्त अर्जांची संख्या   

यवतमाळ ८९९,  कळंब १३६७, राळेगाव ७१६, घाटंजी २१८९, दारव्हा१०,७२५,  नेर  ७३१०,  आर्णी १०,८२०, बाभूळगाव चार हजार ४४५, पुसद २६४८५, दिग्रस ११ हजार ७३५, उमरखेड २२हजार८८४, महागाव १०,५७०, पांढरकवडा ७४९५, वणी ५६५ झरी २४९४   व  मारेगाव ४९९ अशी प्राप्त अर्जांची संख्या आहे.