Thu, Aug 13, 2020 16:43होमपेज › Vidarbha › गोंदियात कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रूग्ण सापडले 

गोंदियात कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रूग्ण सापडले 

Last Updated: Jul 04 2020 1:09PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. गोंदियात आणखी अकरा जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचा अहवाल गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला.

नव्यानेच आढळून आलेले अकरा कोरोना बाधित रुग्ण हे गोंदिया तालुका - ८ रुग्ण, सडक/अर्जुनी तालुका - २ रुग्ण आणि एक रुग्ण हा तिरोडा तालुक्यातील आहे. काही दिवसांपासून दररोज कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे. आतापर्यंत बाधित रुग्णाची संख्या १५६ झाली आहे. तर क्रियाशील रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली आहे. गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडून १९३ अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. आतापर्यंत १०४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. क्रियाशील रुग्ण ५२ आहेत. यातील दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पाठविले आहे. तर ५० रुग्ण गोंदियात उपचार घेत आहे.

गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत कोरोना संशयित ३६१३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये १५६ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे,तर १९३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक-डॉ. कादंबरी बलकवडे 

गोंदियात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. चार जुलैपासून एक विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बलकवडे म्हणाल्या, जे व्यक्ती चेहऱ्यावर व नाकावर मास्क किंवा रुमाल बांधणार नाही तसेच एखाद्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करतील अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाची संसर्ग साखळी तोडावी लागणार आहे. ही संसर्ग साखळी इथेच तोडली नाही तर भविष्यात वेगाने कोरोनाचा फैलाव होणार आहे.