Sun, Sep 20, 2020 05:41



होमपेज › Vidarbha › 'आता तुमच्या घराजवळच कोविड टेस्टिंग सेंटर' 

'आता तुमच्या घराजवळच कोविड टेस्टिंग सेंटर' 

Last Updated: Aug 04 2020 11:31AM




नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनावर मात करण्यासाठी लवकर निदान होणे आणि उपचार घेणे याला जास्त महत्व आहे. त्यामुळे कोरोनाची चाचण्यांची क्षमता वाढवणे आणि ती सहज उपलब्ध होईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच नागपूर महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. आता शहरातील विविध भागात कोविडसंदर्भातील सर्व सेवा सुरू केल्या असून नागरिकांना आता आपल्या घराजवळच चाचणी, समुपदेशन व अन्य सेवा उपलब्ध होत आहेत. 

नागपूर शहरात २१ ठिकाणी अशी सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा व पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या किंवा लक्षणे असल्यास आपली कोविड चाचणी करवून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागपुरातील सहा ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत चाचणी करता येईल. यामध्ये आशीनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ७ मधील पाचपावली पोलिस वसाहत, धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग क्र. १४ मध्ये लॉ कॉलेज होस्टेल आणि रवि भवन, धरमपेठ झोनमधील प्रभाग क्र. १५ मध्ये मॉरिस कॉलेज होस्टेल, मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग क्र. १० मधील राज नगर आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग क्र. ३७ मधील आर.पी.टी.एस. या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

याव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही सेवा उपलब्ध राहील. यामध्ये धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग क्र. १३ मधील फुटाळा आणि तेलंगखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग ९ मधील इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ८ मधील मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, लक्ष्मीनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३८ मधील जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. २० मधील जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ११ मधील झिंगाबाई टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. १९ मधील भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. २१ मधील शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरुनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. २६ मधील नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनअंतर्गत प्रभाग क्र. २५ मधील पारडी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३३ मधील बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनअंतर्गत प्रभाग क्र. २४ मध्ये असलेल्या डिप्टी सिग्नल प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरुनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३० मधील बिडीपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि धरमपेठ झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. १३ मधील हजारीपहाड प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रांचा समावेश आहे.

३८ कोविड सेंटरचा प्रयत्न

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात एक असे एकूण ३८ कोविड टेस्टिंग सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न असून प्रत्येक नागरिकाला घराजवळ चाचणी करता यावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

 जलद निदान आणि तातडीने उपचार

नागपूर शहरात कोविड-१९ मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचे कारण कोविड-१९ चे उशिरा निदान होणे आणि अंतिम क्षणी उपचार होणे हे आहे. आता नागरिकांनीच चाचणीसाठी पुढाकार घेऊन लक्षणे असो अथवा नसो, प्रत्येकाने कोविड-१९ ची चाचणी करवून घेतल्यास लवकर निदान करता येईल. कोविड-१९, सारी सोबतच अन्य रक्त तपासणी करून निदान करण्यात येईल. त्यातून पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला आमदार निवास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येईल. तेथे अन्य तपासण्या केल्यानंतर लक्षणे आहेत किंवा नाहीत, तो सारीचा रुग्ण आहे का यावरुन त्याने कोणत्या रुग्णालयात उपचार करायचे हे ठवले जाईल. तसेच त्याला गृह अलगीकरणात ठेवायचे का याचा निर्णय महानगरपालिका घेईल, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.





 







"