नॉयलॉन मांजा प्रकरणी नागपूर खंडपीठाची पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस

Last Updated: Jan 14 2021 7:17PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

बंदी घालण्यात आलेल्या नॉयलॉन मांजाच्या सर्रास वापराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावली. तसेच येत्या दोन आठवड्यात या नोटीसीवर पर्यावरण विभागाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत. नॉयलॉन मांजा संदर्भात या पुर्वी देण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे पालन होत नसल्याने न्यायालयाने स्वतः जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच राज्याच्या पर्यावरण विभागाला नोटीस ही बजावली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नॉयलॉन मांजाच्या घातक परिणामांची गंभीर दखल घेतली. तसेच यासंदर्भात आवश्यक आदेश देण्याकरता स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर गुरुवारी (दि. १४) सुनावणी घेण्यात आली. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. देवेंद्र चव्हाण यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नॉयलॉन मांजाने प्रणय प्रकाश ठाकरे (वय २१) या तरुणाचा मंगळवारी इमामवाडा परिसरात गळा कापून वेदनादायी मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच मानेवाडा येथे सौरभ पाटणकर (वय २२) हा तरुण नॉयलॉन मांजाने गळा कापण्यापासून थोडक्यात बचावला. त्याने वेळीच गळ्यापुढे हात धरला. त्यामुळे केवळ त्याच्या हाताला इजा झाली. तसेच, डिसेंबरमध्ये झिंगाबाई टाकळी येथे एका तरुणाचा नॉयलॉन मांजाने गळा चिरला गेला. नॉयलॉन मांजामुळे यावर्षी अशा अनेक घटना घडल्या. नॉयलॉन मांजा पशुपक्ष्यांसाठीही घातक ठरत आहे. नॉयलॉन मांजामुळे असंख्य पक्षी मृत्यूमुखी पडले व गंभीर जखमी झाले आहेत. हा मांजा पशुंनाही इजा पोहचवत आहे. 

दरम्यान राज्यात नॉयलॉन मांजा खरेदी-विक्री व वापरावर बंदी आहे. परंतु, काही व्यापारी पैशाच्या लालसेपोटी चोरून नॉयलॉन मांजाची विक्री करतात. यामुळे बंदी घालण्यात आल्यानंतरही नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. याचीच दखल घेऊन न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.