नागपूर विभागात खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण

Last Updated: Apr 18 2020 1:02PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


 


नागपूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे सध्या ‘लॉकडाऊन’ची परिस्थिती असली तरी शेतीच्या खरीप हंगामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. विभागात सरासरी खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी दिली. खरीप हंगामासाठी कापूस सोयाबीन तूर, भात आदी पिकांचे नियोजन कृषी विभागातर्फे जिल्हानिहाय करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध असून त्यांच्या मागणीनुसार कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात कृषी विभगातर्फे तालुका तसेच मंडळस्तरावर गावनिहाय खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या बियाणे व खतांच्या पुरवठ्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठीचे नियेाजन पूर्ण केले असल्याची माहिती कृषी सहसंचालकांनी यावेळी दिली. 

खरीप हंगामातील विविध पिकानुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस पिकासाठी विभागात ६ लाख ७२ हजार ३८७ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून यासाठी ३६ लाख ७२ हजार ८७ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे.  विभागासाठी ३९ लाख २२ हजार ४४३ क्विंटल बियाणे खाजगी व सार्वजनिक कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीपेक्षा २ लाख क्विंटल जास्तीचे बियाणे उपलब्ध आहे.

सोयाबीन पिकांतर्गत खरीप हंगामात सरासरी ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १ लाख ६३ हजार ४३५ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून खाजगी व सार्वजनिक संस्थांकडून १ लाख १७ हजार २७ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. यासोबत शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होणार आहे. तूर पिकांतर्गत १ लाख ९४ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून त्यासाठी ११ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यानुसार विभागात बियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी दिली. 

वाचा - व्यावसायिक आणि खासगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी

धान पिकाची लागवड नियोजन

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात भात पिकांची प्रामुख्याने लागवड होत असल्यामुळे या पिकांतर्गत खरीप हंगामात ७ लाख ८९हजार १७४ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. भात पिकासाठी १ लाख ७९ हजार ३९६ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून विभागात खाजगी व सार्वजनिक संस्थांकडून २ लाख ७६ हजार ८४५ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहेत. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या बियाण्यांचे नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती भोसले यांनी दिली.

कृषी विभागातर्फे खरीप हंगामातील पिकांच्या बियाण्यांचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात २ लाख ३५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कापूस, १ लाख २५ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. 

नागपूर जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, १ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर भात तसेच ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रात भात, १२ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर तर ५५० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे नियोजन पूर्ण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात १ लाख २५ हजार ८० हेक्टर क्षेत्रावर भात तर १ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकांचे नियोजन आहे. 

वाचा - लॉकडाऊनमध्ये २० एप्रिलपासून काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ९७ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावर कापूस, १ लाख ८० हजार १९३ हेक्टर क्षेत्रावर भात, ४९ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर ४३ हजार  ६०५ हेक्टर क्षेत्रावर तुरीचे नियोजन आहे. गडचरोली जिल्ह्यात १ लाख ९५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भात, १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर कापूस, ७ हजार ९४६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे नियोजन पूर्ण झाले आहे.