यवतमाळ : पुढारी ऑनलाईन
संयोजकांनी आयोजकांसमोर झुकणे बरोबर नाही, एका झुंडीला दुसऱ्या झुंडीने उत्तर देणे बरोबर नाही, अशा शब्दात ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. नयनतारा सेहगल यांचे विचार जपायला आणि जोपासायला हवेत असेही मत अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले. आपला विवेक जागृत ठेवायला हवा, सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे असेही ढेरे म्हणाल्या.
साहित्य संमेलनाचे हे संवादाचे व्यासपीठ आहे, त्यांची जपणूक व्हायला हवी, असेही ढेरे म्हणाल्या. विचारवंतांनी सजग राहणे आवश्यक आहे, भविष्य महत्त्वाचे आहेच त्याचबरोबर माणूस आणि माणुसकी सुद्धा मोठी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. कलावंत आणि साहित्यिकांबाबतीत मृत गोष्टी गळून पडल्या पाहिजेत, जुने विचार, जुन्या जाणीवा साहित्यिकांनी झटकून टाकल्या पाहिजेत. आपल्या संवेदना कोरड्या पडू नयेत याचीही काळजीही साहित्यिकांनी घेतली पाहिजे. असेही मत ढेरे यांनी व्यक्त केले.
नयनतारा सहगल आल्या असत्या तर त्यांचे विचार समजू शकले असते. आता त्यांचे भाषण आपल्याला मिळाले आहे मात्र त्या कशाप्रकारे आवाज उठवतात, त्यांनी काय काय अनुभव घेतले आहेत? हे आपल्याला ऐकायला मिळाले असते असेही ढेरे यांनी नमूद केले.