होमपेज › Vidarbha › अमेरिकेतील भारतीयांच्या नोकर्‍या पूर्णपणे सुरक्षित

अमेरिकेतील भारतीयांच्या नोकर्‍या पूर्णपणे सुरक्षित

Published On: Feb 27 2018 7:44PM | Last Updated: Feb 27 2018 7:40PMनागपूर : प्रतिनिधी

ट्रम्प सरकारने एच 1 बी व्हिसाच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केल्यामुळे अमेरिकेत नोकरी करणार्‍या भारतीयांच्या मनात धाकधूक निर्माण झाली. यावर अनेक प्रकारच्या घडामोडी माध्यमांमधून पुढे आल्या; पण अमेरिकेचे भारतातील कौन्सिलेट जनरल एडगर्ड केगन यांनी या नियमांमध्ये कुठलेही बदल झालेले नसून, अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांच्या नोकर्‍या सुरक्षित असल्याचे  नागपुरात स्पष्ट केले.

मुंबईतील अमेरिकन दूतावासाचे कौन्सिलेट जनरल म्हणून गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर एडगर्ड केगन यांनी प्रथमच नागपूर दौरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास आग्रहास्तव या दौर्‍याचे नियोजन करण्यात आले. एच 1 बी व्हिसासंदर्भात ते म्हणाले, हा व्हिसा केवळ भारतातील लोकांसाठी नसून, जगभरातून अमेरिकेत येणार्‍यांसाठी आहे. माध्यमांमध्ये यासंदर्भात चर्चा घडून आल्यामुळे लोक अस्वस्थ झाले; पण मुळात एच 1 बी व्हिसाच्या नियमांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, याची मात्र नक्‍कीच आधीपेक्षा अधिक प्रमाणात काळजी घेतली जात आहे.

सद्यस्थितीत अमेरिकेत नोकरी करणार्‍या आणि भविष्यात येण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीयांना मुळीच चिंता करण्याची गरज नाही. भारत आणि अमेरिकेचे संबंध वृद्धिंगत करण्याचे काम दोन्ही देशांकडून सातत्याने होत आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अठरा वर्षांमध्ये अमेरिकेचे चार राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे तीन पंतप्रधान सातत्याने दोन्ही देशांचे संबंध द‍ृढ करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यात यशही आले.

सध्या नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम या दोघांनीही आपापल्या प्रशासकीय यंत्रणेला विशेषत्वाने याची काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. अद्याप अमेरिकेच्या उद्योगविश्‍वातील अनेक लोकांना भारताच्या प्रगतीबाबत माहिती नाही. त्यांना भारतात गुंतवणुकीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले.