Fri, Apr 23, 2021 14:27
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले...

Last Updated: Feb 15 2021 4:25PM

नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कुणाच्या दबावाचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणी नियमानुसार चौकशीनंतरच सत्य काय ते बाहेर येईल, त्यानंतरच राठोड यांच्या राजीनाम्या विषयी सरकार निर्णय घेईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. एका खासगी रुग्णालयात १२ दिवस कोरोनावरील उपचार घेतल्यानंतर मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आणखीन आठ दिवस त्यांना गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे.  

यावेळी पत्रकारांनी गृहमंत्री देशमुख यांना, वनमंत्री संजय राठोड या घटनेपासून गायब आहेत. ते कुठे आहेत? असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना देशमुख यांनी राठोड कुठे आहेत? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीही योग्य चौकशी होईल हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार चौकशी होईल, असेही देशमुख म्हणाले. 

त्याचबरोबर या प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत देशमुख यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. तर पोलिस व्यवस्थित तपास करत आहेत, असंही त्यांनी सांगितले. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल. त्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्याविषयी सरकार निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भंडारा शिशू जळीत कांड प्रकरणी अजूनही एफआयआर दाखल झालेला नाही असे विचारले असता, या बाबतीत मुंबईला गेल्यावर माहिती घेतो, असं देशमुख यांनी स्पष्ट केले.

सेलिब्रेटी ट्विटबाबतीत वक्तव्याचा विपर्यास

सेलिब्रेटी ट्विटबाबतीत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आम्ही भाजपाच्या आयटी सेलची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीत आयटी सेलचे प्रमुख आणि बारा जणांची नावे समोर आली आहेत. या बाबतीत चौकशी सुरू आहे. लता मंगेशकर आमच्या दैवत आहेत. तर सचिन तेंडूलकर भारताचे भूषण आहेत. त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही देशमुख म्हणाले. साईबाबाला नागपूर जेलमध्ये ठेवले आहे. त्यांच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेऊन उपचार सुरू आहे, असे ते म्हणाले.