Thu, Jun 24, 2021 11:50
आरोग्य अधिका-यांना शिवीगाळ; देवळीचे काँग्रेस आमदार रणजित कांबळेंवर गुन्हा दाखल

Last Updated: May 11 2021 9:06PM

वर्धा : पुढारी वृत्तसेवा

वर्ध्यातील देवळीचे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्याविरुद्ध जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना फोनवरून शिवीगाळ करत धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. 

देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ करत धमकवल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर डॉ. अजय डवले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणी वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील शाळेत कोरोना आरटीपीसीआर, ॲटीजन चाचणी शिबीर घेण्यात आले. लॉकडाऊनमध्ये शिबिर कसे आयोजित केले, यावर विचारताना आमदार कांबळेनी डॉक्टर डवले यांना शिवीगाळ केल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये पुढे येते. 

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी आमदार रणजित कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

आमदार कांबळे यांना अटक न केल्यास आंदोलनाचा भाजपचा इशारा 

कोरोनाकाळात डॉक्टर सेवा देत आहे. असे असताना आमदार कांबळे यांनी डॉक्टर डवले यांना केलेली शिवीगाळ मनोबल खच्ची करणार आहे. आमदार कांबळे यांनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणाचा निषेध नोंदवत आमदार कांबळे यांना अटक करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, भाजप प्रदेश महासचिव राजेश बकाने, जिल्हा परिषद सभापती मृणाल माटे यांची उपस्थिती होती. 

यावेळी आमदार रणजित कांबळे यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याच्या कलमा लावून अटक करण्याची मागणी खासदार रामदास तडस यांनी केली. कारवाई न केल्यास भाजपच्या वतीने जिल्हा, तालुकास्तरावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यापूर्वीही अधिकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप खासदार तडस यांनी केला.