Sat, Jul 11, 2020 12:33होमपेज › Vidarbha › अखेर प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

अखेर प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Apr 06 2019 1:52AM | Last Updated: Apr 06 2019 1:52AM
नागपूर : प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची बुधवारी सायंकाळी दिग्रसमध्ये सभा पार पडली. या सभेतील आपल्या भाषणात अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘आमची सत्ता आल्यास निवडणूक आयुक्ताला दोन दिवस जेलमध्ये टाकू’ असे विधान केले होते.

निवडणूक आयोग प्रचारात पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक याचा उल्लेख करण्यास मनाई करीत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांनी हे विधान केले होते. या विधानाच्या अनुषंगाने दारव्हाच्या उपविभागीय निवडणूक निर्णय अधिका-यांकडून अहवाल मागण्यात आला. त्यात हे विधान केल्याचे स्पष्ट असल्याने आंबेडकरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

निवडणूक विभागाच्या वतीने पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक जोशी यांनी यासंबंधी फिर्याद नोंदविली. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध भादंवि 503, 506, 189 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे दारव्हाचे उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहीम चौधरी यांनी सांगितले.