Mon, Nov 30, 2020 13:37होमपेज › Vidarbha › नागपूर पदवीधर मतदारसंघ : भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचे तगडे आव्हान 

नागपूर पदवीधर मतदारसंघ : भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचे तगडे आव्हान 

Last Updated: Nov 22 2020 10:17AM
नागपूर : संजय पाखोडे 

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातील नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मागील ४२ वर्षापासून नागपूर पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार विजयी झाले आहेत. सुरुवातीला भाजपचे गंगाधरराव फडणवीस, नंतर नितीन गडकरी आणि २०१४ मध्ये भाजपचे प्रा. अनिल सोले हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी थेट लढत नागपूर पदवीधर मतदारसंघात होत आहे. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. या मतदारसंघात भाजपनेच आजपर्यंत प्रतिनिधित्व केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही जागा संदीप जोशी यांना कायम राखावी लागणार आहे. तर काँग्रेसचे अभिजित वंजारी मागील दोन वर्षांपासून या मतदारसंघात बांधणी करीत आहे. वंजारी यांनी विधानसभेऐवजी पदवीधरवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

येत्या १ डिसेंबरला या निवडणुकीकरिता मतदान होणार आहे. राजकीय पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक होत नसली तरी राजकीय पक्षाच्या पाठिंब्यावर उमेदवार निवडणूक लढवित असल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. यावेळी मात्र राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याचेच चित्र आहे. नागपुरात भाजपने विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे अभिजीत वंजारी ही निवडणूक लढवित आहे. या मतदारसंघात अद्यापपर्यंत काँग्रेसचा कोणीही उमेदवार विजयी झालेला नाही. 

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे प्रा. अनिल सोले हे विद्यमान आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. मागील चार दशकांहून अधिक काळ नागपूर पदवीधर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे गंगाधर राव फडणवीस, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांनी मागील चार दशके या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विद्यमान आमदार अनिल सोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असून त्यांची नितीन गडकरी यांच्याशी जवळीक आहे. राज्यात भाजपमध्ये गेल्या काही वर्षात झालेले राजकीय बदल बघता यंदा अनिल सोले यांनाच पुन्हा उमेदवारी देणार की भाजपमधील दुसरा उमेदवार देणार याकडे गांभिर्याने बघितले जात होते. मात्र ऐनवेळी भाजपने विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांचे तिकीट कापले आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले महापौर संदीप जोशी यांना नागपूर पदवीधरमधून उमेदवारी दिली. महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून यंदा भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना मैदानात उतरविले आहे. मागील दोन वर्षापासून नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी मतदार नोंदणीसाठी बरीच मेहनत घेतली आहे. मतदारांची नोंदणी करण्यात वंजारी भाजपच्या तुलनेत आघाडीवर होते. त्यामुळे भाजपचा पराभव करण्याकरिता महाविकास आघाडीचे नेते सक्रिय झाले आहे. त्यामुळे नागपुरात आता काँग्रेसचे अभिजीत वंजारी विरूद्ध भाजपचे संदीप जोशी असा सामना रंगणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पाच उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने २६ उमेदवार उरले होते. यातील सात उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे नागपूर पदवीधरच्या रिंगणात १९ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. आता रिंगणात काँग्रेसचे अभिजीत वंजारी, भाजपचे संदीप जोशी यांच्यासह रिपा (खो)चे राजेंद्र चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, मानवाधिकार पक्षाच्या अ‍ॅड. सुनीता पाटील व विदर्भवादी संघटनांचे नितीन रोंघे हे प्रमुख उमेदवार आहेत.

या व्यतिरिक्त अजय तायवाडे, अतुलकुमार खोब्रागडे, अमित मेश्राम, नीतेश कराळे, प्रकाश रामटेके, प्रशांत डेकाटे, मो. शाकिर, राजेंद्र भुतड़ा, विनोद राऊत, वीरेंद्र कुमार जायस्वाल, शरद जीवतोड़े, संगीता बढ़े, संजय नासरे हे अपक्षदेखील आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे क्षेत्र मोठे आहे. इतक्या मोठ्या कार्यक्षेत्रात जाऊन प्रचार करताना उमेदवारांचा कस लागत आहे. खऱ्या अर्थाने उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा आणि गोंदिया असे सहा जिल्ह्यांत २ लाख ६ हजार मतदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत २ लाख ८८ हजार मतदार होते. यावेळी मात्र ८२ हजार मतदार कमी झाले. त्यामुळे कमी झालेल्या मतदारांचा फटका भाजपला की काँग्रेसला बसतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.