Sat, Nov 28, 2020 17:04होमपेज › Vidarbha › यवतमाळ : महसूलच्या पथकावर रेती तस्करांचा हल्ला; दोन तलाठी जखमी       

यवतमाळ : महसूलच्या पथकावर रेती तस्करांचा हल्ला; दोन तलाठी जखमी       

Last Updated: May 23 2020 3:44PM
उमरखेड (यवतमाळ) : पुढारी वृत्तसेवा

फुलसावंगी येथून अवैधरीत्या रेती घेवून उमरखेडकडे येणाऱ्या वाहनाला रोखण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर रेती तस्करांनी हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २२) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास येथून पाच किमी अंतरावर असलेल्या चुरमुरा येथे घडली.

याबाबत तलाठी पंजाब सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलसावंगी (ता. महागाव) येथील रेती तस्कर मुजम्मिल खान व त्याच्या दोन सहकाऱ्यांवर उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फुलसावंगी येथून  दोन ट्रॅक्टर विनापरवाना रेती चोरी करून उमरखेडच्या दिशेने येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांना मिळाली. त्यांनी सदर दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेण्याचे आदेश तलाठी सानप यांना दिले. सानप  यांनी आपले सहकारी गजानन सुरोशे यांच्यासह रात्री पावणेदहा वाजता चुरमुरा येथे दगड थर रस्त्यावर पाळत ठेवली असता, दोन  ट्रॅक्टर रेती घेऊन उमरखेडच्या दिशेने येताना दिसले. त्यांना थांबविले असता, त्याचा मालक मुजम्मिल खान याने ट्रॅक्टरची ट्रॉली जोडणारी लोखंडी पीन काढून या दोघांवर हल्ला केला. त्यात तलाठी सुरोशे यांच्या हाताला मार लागला, तर तलाठी  सानप त्यांच्या पाठीवर व  डोक्याला वर वार केला. त्यात ते जखमी झाले. त्यावेळी झालेल्या ओरडाओरडीमुळे चुरमुरा येथील नागरिक त्यांच्या बचावासाठी धावत आले. ट्रॅक्टर चालक व त्यांच्या मालकाने गावकऱ्यांवर दगडफेक केली. तसेच रेती रस्त्यावरच खाली करून एक रिकामा ट्रॅक्टर पळून नेला. परंतू गावकर्‍यानी बबलू उर्फ अजिम  इसाखान या चालकास पकडले. दुसरा ट्रॅक्टर देखील पकडला.

याप्रकरणी सानप त्यांनी उमरखेड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून आरोपींविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.