Sat, Jul 04, 2020 06:54होमपेज › Vidarbha › नागपूर : आता महिला डॉक्टरवर केलेल्या ॲसिड हल्ल्यात तिघी जखमी

नागपूर : आता महिला डॉक्टरवर केलेल्या ॲसिड हल्ल्यात तिघी जखमी

Last Updated: Feb 13 2020 4:13PM

संग्रहित छायाचित्रनागपूर : विशेष प्रतिनिधी

हिंगणघाट, औरंगाबाद, जालना येथील जळीतकांड ताजे असतानाच नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला झाला आहे. गुरूवारी (दि.१३) दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी निलेश कन्हेरे (वय २२) या आरोपीला अटक केली आहे. 

नागपुरातील एका रूग्णालयात वैद्यकीय सेवा देणारी ही महिला डॉक्टर आरोग्याशी निगडीत सर्वेक्षण करण्याकरीता आपल्या चमूसह सावनेर येथे गेली होती. सावनेर येथील पहिलेपारच्या कळकळी महाराज मंदिरावर सर्वेक्षणाचे काम करीत असतानाच एक २२ वर्षीय युवक तेथे आला आणि तुझ्या अंगावर अॅसिड फेकतो असे म्हणत महिला डॉक्टरवर अॅसिड फेकले.

तेवढ्यात त्या महिला डॉक्टरने चेहरा फिरविला. मात्र युवकाने फेकलेले अॅसिड महिला डॉक्टर जवळ उभी असलेल्या एका विद्यार्थीनीवर आणि एका महिलेवर पडले. या घटनेत त्या तिघी जखमी झाल्या. हल्ला झाल्याबरोबर आसपासच्या नागरिकांनी युवकाला पकडून चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

जखमी तिघींनाही नागपुरातील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. यात महिला डॉक्टरच्या अंगावर फेकलेल्या अॅसिडचे शिंतोडे अन्य दोघींवर उडाल्याने त्या जखमी झाल्या आहेत.