रेल्वेच्या धडकेत वाघाचा बछडा ठार, बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावरची घटना

Last Updated: Mar 08 2021 3:10PM
Responsive image
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा 

बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर मालवाहक रेल्वे गाडीच्या धडकेत वाघाचा बछडा ठार झाला. सोमवारी (ता. ८) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. हा बछडा ६ महिन्याचा होता. रेल्वे लाईन क्रास करताना बछड्याला रेल्वेची धडक बसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील पिंडकेपार गराडा बीट लगत नागझीरा अभयारण्य वनपरिसर आहे. या परिसरातून वन्यजीव प्राण्यांचे भ्रमण होत असते. सोमवारी सकाळच्या सुमारास वाघीण आपल्या बछड्यासह रस्ता क्रास करीत असताना एका बछड्याची त्यावेळी जाणा-या मालवाहक रेल्वेला जबर धडक लागली. यात बछडा जागीच ठार झाला.  या घटनेची माहिती गोरेगाव येथील वन विभागाला देण्यात आली. वन विभाग अधिका-यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून बछड्याचा मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीला पाठविला. 

बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गाचा बराचसा भाग हा नागझिरा अभयारण्यात येतो.  या अभयारण्यात वाघांसह प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.  हे प्राणी नेहमीच रेल्वे लाईन क्रास करीत असतात. त्यात ब-याच प्राण्यांबाबत अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे या प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.