होमपेज › Vidarbha › यवतमाळ : दुग्ध उद्योगाचे भविष्य; दोन दिवस राष्ट्रीय परिषद

यवतमाळ : दुग्ध उद्योगाचे भविष्य; दोन दिवस राष्ट्रीय परिषद

Last Updated: Dec 13 2019 8:18AM

संग्रहित छायाचित्रपुसद (यवतमाळ) : प्रतिनिधी

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड (पुसद) च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १४ व १५ डिसेंबर असे दोन दिवस राष्ट्रीय परिषद व माजी विद्यार्थ्यांच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून दुग्ध उद्योगाचे भविष्य दृष्टिक्षेप २०२५ या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांचे हस्ते उद्घाट होणार्‍या या कार्यक्रमाला अधिष्ठाता पशू वैद्यक विद्याशाखा व संचालक शिक्षण डॉ. ए. पी. सोनकुवर तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे संचालक संशोधन डॉ. एन. व्ही. कुरकुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुडचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. जी. वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. या परिषदेत नामांकित संशोधक व विविध नामवंत संस्थांमधील दुग्ध उद्योग विषयाचे १५० उत्कृष्ट व्याख्याते सहभागी होतील. 

दुग्ध उद्योग विषयातील विविध विषयांवर व्याख्याने, गटचर्चा, मौखिक समुदाय चर्चा तसेच पोस्टर सादरीकरणचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमात दुग्ध विद्याशाखेचे प्राध्यापक, शास्त्रज्ञ, माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त माजी सहयोगी अधिष्ठाता, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार केला जाणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. जी. वासनिक यांनी दिली.