Sat, Dec 07, 2019 09:47होमपेज › Vidarbha › गडकरींचे आव्हान कोण पेलणार?

गडकरींचे आव्हान कोण पेलणार?

Published On: Feb 15 2019 1:50AM | Last Updated: Feb 14 2019 8:47PM
अविनाश पाठक

नागपूर मतदारसंघात नागपूर शहराचाच बहुतांश सर्व भाग समाविष्ट असून मध्य नागपूर, पूर्व नागपूर, पश्‍चिम नागपूर, उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर आणि दक्षिण-पश्‍चिम नागपूर अशा सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.
1952 ते 2009 या कालखंडातील बहुतांश सर्व निवडणुकांमध्ये या मतदारसंघात काँगे्रसनेच बाजी मारली. 1962 मध्ये या मतदारसंघातून जुने काँग्रेसी असलेले लोकनायक बापूजी अणे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1971 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे निवडून आले होते. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत आधी काँगे्रसचे आणि नंतर राममंदिराच्या मुद्द्यावर भाजपमध्ये आलेले बनवारीलाल पुरोहित या मतदारसंघातून विजयी झाले होते. 

2014 मध्ये याआधी सतत 4 वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले काँगे्रस उमेदवार माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा दणदणीत पराभव करून भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले. या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी 5,87,767 मते घेतली; तर मुत्तेमवार यांना 3,02,939 मते पडली. गडकरींनी जवळजवळ 2,84,828 मतांची घसघशीत आघाडी घेतली. 

गडकरींच्या या विजयामागे 2014 मध्ये देशभरात असलेली मोदी लाट हे प्रमुख कारण तर होतेच; शिवाय शहर काँगे्रसमध्ये असलेल्या अंतर्गत बंडाळ्या, या बंडाळ्या आणि भांडणांमुळेच मुत्तेमवारांचा पराभव झाला. 5 वर्षांत नागपुरात शहर काँगे्रसची पुनर्बांधणी करण्याचे अनेक प्रयत्न झाले खरे; पण या पक्षाला नागपुरात जुने दिवस दिसण्याचे चिन्ह आज तरी दिसत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर गडकरींनी केंद्रात मंत्री बनल्यावर आणि त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यावर या संपूर्ण परिसरातच विकासकामांचा जबरदस्त धडाका लावला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर गडकरींच्या विरोधात तगडा उमेदवार कोण, यावर खल सुरू झाला आहे. काँगे्रसमध्ये स्वत: विलास मुत्तेमवार, शहर काँगे्रसचे अध्यक्ष माजी महापौर विकास ठाकरे, महापालिकेतील एक दिग्गज प्रफुल्ल गुडधे, निवृत्त प्राचार्य बबन तायवाडे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री अनिस अहमद आणि डॉ. नितीन राऊत, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख असे सर्वच हेवीवेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. यात काँगे्रस पक्ष कोणाच्या पदरात उमेदवारी टाकणार, हे आज तरी अनिश्‍चित आहे. 

याच दरम्यान विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही नावे चर्चेत आहेत. विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यात अ‍ॅड. अणे नागपुरातून लढले तर ते निवडून येण्याची शक्यता नाही; मात्र त्यांची समाजातील प्रतिमा लक्षात घेता ते गडकरी आणि काँगे्रसच्या उमेदवाराची मते निश्‍चित खातील, यात शंका नाही.  

अ‍ॅड. आंबेडकर हेदेखील नागपुरातून उभे राहिले, तर दलित व्होट बँकेला ते धक्का लावू शकतात. सध्या नागपुरातील दलित व्होट बँक सांभाळणारे अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, जोगेंद्र कवाडे अशी मंडळी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या गडकरींच्याच सोबत आहेत. काँगे्रसचे दलित उमेदवार म्हणून ओळखले जाणार्‍या नितीन राऊत यांना नागपुरातून उमेदवारी मिळाली नाही, तर रामटेकसाठी ते प्रयत्नशील आहेत. अशा वेळी आंबेडकरांची उमेदवारीही गडकरींच्या विरोधात फारसा जोर दाखवू शकेल, असे चित्र आज तरी नाही. याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस आणि बसप या पक्षांचा नागपुरात तरी काहीच जोर दिसत नाही. 

सध्या नागपूर जिल्ह्यातील सावनेर वगळता सर्व मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत. नागपूर शहरातील महानगरपालिका आणि जिल्ह्यातील जिल्हा परिषद हीसुद्धा भाजपच्याच ताब्यात आहे. गडकरी माझे काका आहेत. मी नागपुरातून निवडणूक लढलो तर त्यांचा पराभव होईल. त्यामुळे त्यांनी दुसरा सुरक्षित मतदारसंघ निवडावा, असा आपुलकीचा सल्ला भाजपमधून आमदारकीचा राजीनामा देऊन काँगे्रसमध्ये गेलेले डॉ. आशिष देशमुख यांनी दिला आहे; मात्र भाजपची शास्त्रशुद्ध पद्धतीने झालेली मतदारसंघाची बांधणी, गडकरींची विकासोन्मुख प्रतिमा आणि धडाकेबाज कार्यशैली, त्याचसोबत भविष्यातील राष्ट्रीय नेता म्हणून त्यांची तयार झालेली प्रतिमा या बाबी लक्षात घेता गडकरींचा पराभव करायचा असेल, तर मग तो कोणताही पक्ष असो किंवा कोणताही उमेदवार, त्याला शास्त्रशुद्ध रणनीती आखून पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल; अन्यथा या मतदारसंघाचे पुढचे खासदार हे नितीन गडकरीच असतील, हे सांगण्यासाठी कोणाही ज्योतिष्याची गरज पडू नये.  

लाखावर नवमतदार

2014 ची या मतदारसंघातील मतदार संख्या 18,99,032 इतकी होती. आजघडीला मतदारांची अंतिम यादी अजून जाहीर झाली नसली, तरी नागपूर मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या 21 लाखांवर गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत 1 लाखावर नवे मतदार नोंदले गेले असल्याची माहिती आहे.