Sun, Aug 09, 2020 01:46होमपेज › Vidarbha › इराणी करंडक : दोन अक्षयनी विदर्भला तारले

इराणी करंडक : दोन अक्षयनी विदर्भला तारले

Published On: Feb 15 2019 1:50AM | Last Updated: Feb 15 2019 1:50AM
नागपूर : वृत्तसंस्था

आठव्या क्रमांकावर आलेल्या अक्षय कर्णेवारचे शतक आणि अक्षय वाडकरचे अर्धशतक या दोघांच्या अक्षय कामगिरीमुळे इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भने शेष भारत संघावर 95 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी रणजी चॅम्पियन विदर्भने पहिल्या डावात 425 धावा केल्या. कर्णेवारने 133 चेंडूत 102 धावा केल्या. त्याने 13 चौकार व 2 षटकार ठोकले. अक्षय वाडकरने 73 धावा केल्या. शेष भारतने पहिल्या डावात 330 धावा केल्या होत्या.तिसर्‍या दिवशी शेष भारतने 35 षटकांत 2 बाद 102 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे 7 धावांची आघाडी झाली आहे. मयंक अग्रवाल 27 आणि अनमोलप्रीतसिंग 6 धावांवर बाद झाले. हनुमा विहारी 40 तर कर्णधार अजिंक्य रहाणे 25 धावा करून खेळपट्टीवर नाबाद आहेत. 

विदर्भने कालच्या 6 बाद 245 धावांवरून पुढे खेळताना सकाळी आश्‍वासक सुरुवात केली. शेष भारतला पहिले यश अक्षय वाडकरच्या रुपाने मिळाले. संघाच्या 305 धावा असताना तो 73 धावांवर बाद झाला. त्याने 139 चेंडूत 14  चौकार लगावले. दरम्यान, अक्षय कर्णेवारने आपले प्रथम श्रेणीतील पहिले शतक झळकावले. शतकानंतर तोही लगेच बाद झाला. त्यानंतर अक्षय वाखरेने 20 आणि रजनीश गुरबाणीने नाबाद 28 धावा केल्या. शेष भारतकडून राहुल चहरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय अंकित राजपूत, के. गौतम आणि धर्मेंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 

पहिल्या डावात 95 धावांनी पिछाडीवर पडलेल्या शेष भारत संघाच्या दुसर्‍या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अनमोलप्रीतची विकेट त्यांनी लवकर गमावली. कसोटीपटू मयंक अग्रवालही लाँगऑफवर सोपा झेल देऊन परतला. हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणे यांनी त्यानंतर 56 धावांची भागीदारी करून कोणतीही पडझड होऊ दिली नाही.

तळाच्या फलंदाजांचे यश

2017-18 साली रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत अक्षय वाडकरने सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना पहिलं शतक झळकावले होते. यंदाच्या इराणी चषकातही अक्षय कर्णेवारने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना शतकी खेळी केली. त्यामुळे हा योगायोग जुळून आल्यास विदर्भ यंदाचा इराणी करंडक पुन्हा जिंकू शकतो.