Mon, Jul 06, 2020 16:25होमपेज › Vidarbha › राम मंदिर प्रकरणात दबावाचा प्रयत्न : शिंदे

राम मंदिर प्रकरणात दबावाचा प्रयत्न : शिंदे

Published On: Jan 06 2019 2:10AM | Last Updated: Jan 06 2019 12:16AM
नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या जागेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकार बाहेरून दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी केला.  असे असले तरी याचा न्यायालयाच्या निकालावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, असा विश्‍वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.

मारवाडी फाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण समारंभासाठी शिंदे नागपूरला आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. न्यायालयाच्या विचाराधीन प्रकरणावर बोलणे योग्य नाही. तसेच कोणी हस्तक्षेपसुद्धा करू नये. दबावामुळे कुठलेही न्यायालय निर्णय घेत नसते, असे ते म्हणाले.

मंदिरावर 10 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर आपले मत व्यक्‍त करण्यास सर्वांना अधिकार आहे. मात्र, आमच्याच बाजूने निर्णय व्हावा, याकरिता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दबाव टाकणे, त्याकरिता कृती करणे योग्य नाही. 

यापूर्वीसुद्धा अनेकांनी काही प्रकरणांत दबावाचे प्रयत्न केले होते. त्याचा न्यायनिवाड्यावर परिणाम झाला नाही. त्यामुळे सर्वांनी संयम दाखवावा आणि न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.