Fri, Dec 06, 2019 06:39होमपेज › Vidarbha › नागपूर मेट्रोचा दुसरा मार्ग दोन महिन्यात सुरू होणार : महामेट्रोची माहिती

नागपूर मेट्रोचा दुसरा मार्ग दोन महिन्यात सुरू होणार : महामेट्रोची माहिती

Published On: Jun 20 2019 7:16PM | Last Updated: Jun 20 2019 7:16PM
नागपूर : हिरा सरवदे

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर येथील मेट्रोचा खापरी ते सिताबर्डी हा पहिला मार्ग सुरू केल्यानंतर आता सिताबर्डी ते लोकमान्य नगर हा दुसरा मार्ग येत्या दोन महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नागपूर मेट्रोच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना मेट्रोचे उपमहाप्रबंधक अखिलेश हळवे म्हणाले, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर दररोज सकाळी तीन आणि सायंकाळी तीन अशा सहा फेऱ्या होत आहेत. या फेऱ्या खापरी ते सिताबर्डी या १३.५ किलो मीटरच्या अंतरासाठी केल्या जात आहेत. या मार्गाला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

मेट्रोच्या प्रवासासाठी आज कमीत कमी १० रुपये तिकीट दर आकारण्यात येत असून, शहरातील सर्व चारही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कमीतकमी १५ आणि जास्तीत जास्त ४१ रुपये तिकीट आकारले जाणार आहे. त्यावेळी महामेट्रो २३ ट्रेनच्या माध्यमातून ६९ कोच सेवेत आणणार आहे. दरम्यान, पुढील दोन महिन्यात सिताबर्डी ते लोकमान्य नगर हा दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोमार्ग सुरू होणार आहे, अशी माहितीही हळवे यांनी दिली.