Wed, Jul 15, 2020 16:30होमपेज › Vidarbha › बुलडाण्यात बहुरंगी सामन्याची शक्यता

बुलडाण्यात बहुरंगी सामन्याची शक्यता

Published On: Feb 24 2019 12:54AM | Last Updated: Feb 23 2019 7:57PM
अविनाश पाठक

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात खामगाव, मेहकर, सिंदखेडराजा, चिखली, जळगावजामोद आणि बुलडाणा हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. 

बुलडाणा जिल्हा हा सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जुन्या जनसंघाचा म्हणजेच आजच्या भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला आहे. जुन्या पिढीतील कै. मदनलाल आणि किसनलाल संचेती, कै. अर्जुनराव वानखेडे, भाऊसाहेब लाहोटी अशा अनेक दिग्गजांनी या क्षेत्रात संघ आणि भाजपची पाळेमुळे रोवली आणि आजही या क्षेत्रात संघ आणि भाजपचेच प्रचंड वर्चस्व आहे. 

1999 पासून या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून येतो आहे. 1991 मध्ये युती झाली तेव्हा हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. मात्र तत्कालीन भाजप नेत्यांनी विनातक्रार शिवसेनेला सांभाळून घेतले. 2004 पर्यंत हा मतदारसंघ आरक्षित होता. त्यावेळी शिवसेनेचे मुंबईहून डेप्युटेशनवर आलेले आनंद अडसूळ हे इथले खासदार होते. बाहेरून आलेला उमेदवार म्हणून त्यांच्याबद्दल नाराजी असली तरी युतीचा धर्म म्हणून भाजप त्यांना सांभाळून घेत होता. 

2009 पासून शिवसेनेचेच प्रतापराव जाधव इथून विजयी होत आहेत. 2014 च्या निवडणुकीत प्रतापरावांनी 5,09,145 इतकी मते घेतली तर काँगे्रसचे कृष्णराव इंगळे यांनी 3,49,566 इतकी मते घेतली. तब्बल 1,59,579 मतांनी प्रतापराव खासदार बनून दिल्लीत गेले. 

आधी बरीच वर्षे आमदारकी आणि आता दोन टर्म खासदारकी उपभोगत असलेल्या प्रतापरावांचे मतदारसंघात इतरांशी तर सोडा; पण स्वपक्षीयांशीही फारसे सख्य दिसत नाही. त्यांना आता पक्षातूनच प्रचंड विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देऊ नये यासाठी बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे, मेहकरचे जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते शिवसैनिक ‘मातोश्री’वर आग्रह धरून असल्याचे बोलले जात आहे. 

स्वपक्षीयांबरोबरच मित्रपक्षातही त्यांना बराच विरोध आहे. सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ भाजपकडे हवा म्हणून स्थानिक भाजप नेत्यांचा आग्रह आहे. भाजपमधील धृपदराव सावळे आणि सतीश गुप्ता हे दोघेही उमेदवारीसाठी आग्रही होते. भाजपचा खुलेआम विरोध जरी झाला नाही तरी निवडणूक प्रचारात असहकार निश्‍चितच असेल, असे आज चित्र आहे. यातच जर सावळे किंवा गुप्ता यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला तर मतदारसंघातील समस्त भाजप कार्यकर्ते त्यांच्या बाजूने उभे राहतील, असे बोलले जाते.  खामगाव आणि जळगाव जामोद हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे; तर मेहकर आणि सिंदखेडराजा हे दोन मतदारसंघ शिवसेेनेकडे आहेत. चिखली आणि बुलडाणा या दोन मतदारसंघांत काँगे्रसचे आमदार आहेत. 

2014 मध्ये प्रतापरावांची सरळ लढत ही काँगे्रसचे कृष्णराव इंगळे यांच्याशी झाली होती. याआधी 2009 मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रतापरावांशी लढत दिली होती. यावेळी हा मतदारसंघ महाआघाडीत राष्ट्रवादी काँगे्रसकडे जाणार, असे चित्र आहे. असे झाले तर पुन्हा एकदा प्रतापराव जाधव विरुद्ध डॉ. राजेंद्र शिंगणे असा सामना होऊ शकेल. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे फारसे काम नसले तरीही शिंगणे परिवाराचा असलेला दबदबा डॉ. शिंगणेंच्या मदतीला येऊ शकतो. 

महाआघाडीत असलेल्या स्वाभिमानी पक्षानेही या मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे. स्वाभिमानी पक्षाचे रविकांत तुपकर हे इथून लढण्यासाठी इच्छुक आहेत. जर स्वाभिमानी पक्ष महाआघाडीतून बाहेर पडला तर रविकांत तुपकर हे स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील आणि मग मतदारसंघात तिहेरी लढत होईल हे निश्‍चित. त्यातच भाजपचे बंडखोर मैदानात उतरले तर हा चौरंगी सामनाही होऊ शकतो. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फेही विद्यमान आमदार बळीराम सिरसकर यांना  रिंगणात उतरवण्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. ते निवडणूक लढले तर बहुरंगी लढत होईल.

या मतदारसंघात असलेले मराठा जमातीचे वर्चस्व हे प्रतापरावांच्या बाजूने उभे राहणार असले तरी माळी समाज आणि ओबीसी समाजही इथे लक्षणीय संख्येत आहे. त्याचबरोबर मुस्लिमांची संख्याही चांगलीच आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेता इथे बहुरंगी लढत झाली तर मग कोण निवडून येईल हे आज तरी सांगणे कठीण आहे. 

या मतदारसंघाने यापूर्वी मुकुल वासनिक आणि बाळकृष्ण वासनिक या पिता-पुत्रांना काँगे्रसचे उमेदवार म्हणून निवडून पाठवले आहे. त्याचबरोबर मुकुल वासनिकांना इथले खासदार असताना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळाले आहे. आनंद अडसूळ यांनाही या मतदारसंघाचे खासदार म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.  

2014 मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 15,90,392 इतके मतदार होते. 2019 ची नेमकी आकडेवारी आली नसली तरी इथे एक लाखावर नवमतदार नोंदले गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे.