नागपूर : प्रतिनिधी
कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी मंजूर झालेला निधी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी वळविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचा रद्द झालेला प्रस्ताव पूर्ववत सुरू व्हावा, या मागणीसाठी कोकणातील आमदारांनी आज विधान भवन परिसरात निदर्शने केली. यात पृथ्वीराज चव्हाणदेखील सामील झाले होते.
यासंदर्भात चव्हाण म्हणाले, 1991 पासून मी हा रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रारंभी हा रेल्वेमार्ग सक्षम नसल्याचे सांगून हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे नाकारले होते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या रेल्वेमार्गाच्या कामाला चालना मिळाली.
या प्रकल्पाचा अर्धा खर्च राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजनही झाले. केंद्रीय रेल्वे मंत्रीपद पियूष गोयल यांच्याकडे आल्यानंतर मात्र आठ दिवसांनीच हा रेल्वे मार्ग मागे टाकून बुलेट ट्रेनला हिरवा कंदिल दाखविला. राज्य सरकारनेही या रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित केलेला निधी बुलेट ट्रेनसाठी वळता करण्याचा निर्णय घेतला. हा कराड व चिपळूण येथील लोकांवर अन्याय आहे. हा रेल्वे मार्ग गोव्याला जोडण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी आमदार हुस्ना बानो खलिफे, आनंदराव पाटील, मोहनराव कदम, रामहरी रुपनवार या सदस्यांनी विधान भवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले असताना राज्याचे तंत्र व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या रेल्वे मार्गाचे काम होईल, असे आश्वासन दिले. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी संपर्क साधला. हा रेल्वे मार्ग होईल, असे आश्वासन गोयल यांनी दिल्याचे तावडे यांनी सांगितले.