Sat, Oct 24, 2020 08:49होमपेज › Vidarbha › राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

Last Updated: Oct 20 2020 1:31AM

मंत्री ॲड. यशोमती ठाकूरनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

"वनवेतून चारचाकी वाहन नेण्यास मनाई करणार्‍या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याच्या प्रकरणात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना अमरावतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात चालक आणि दोन कार्यकर्त्यांना देखिल शिक्षा झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फाळके) यांच्या न्यायालयाने गुरूवारी (दि. १५) हा निकाल दिला आहे.

तीन महिने सश्रम कारावास व प्रत्येकी १५ हजार ५०० रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास १ महिने अतिरिक्त कारावास असे शिक्षेचे स्वरूप आहे. २४ मार्च २०१२ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडलेल्या या मारहाण प्रकरणात ही शिक्षा न्यायालयाने ठोठावली. शिक्षा झालेल्यांमध्ये महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह सागर सुरेश खांडेकर, शरद काशीराव जवंजाळ व राजीव किसन इंगळे यांचा समावेश आहे. अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील मिलींद जोशी यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली. 

याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मिलिंद जोशी यांनी यशस्वी युक्तीवाद केला. या प्रकरणात न्यायालयाने ५ साक्षीदार तपासले त्या पैकी दोन साक्षिदार फितूर झाले. या दोन पैकी एक साक्षिदार हा सरकारी कर्मचारी असून पोलिस आहे. फितूर झालेल्या या साक्षीदाराच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा व सत्र न्यायालयाने अमरावतीच्या पोलिस आयुक्तांना केली आहे असेही मिलींद जोशी यांनी सांगितले. 

अशी घडली होती घटना

या घटनेची तक्रार शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात नोंदवली होती. दोषारोपपत्रानुसार, घटने दिवशी २४ मार्च २०१२ रोजी दुपारी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार व विद्यमान कॅबीनेट मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आपल्या चारचाकी वाहनाने काही कार्यकर्त्यांसह अमरावतीत चुना भट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस उल्हास रौराळे यांनी एकेरी मार्ग असल्यामुळे त्यांचे वाहन अडविले. त्यावर ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद व राजू यांनी वाहनाखाली उतरून उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला आणि कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. या घटनेच्या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३५३ , ३३२, १८६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. 

हायकोर्टात न्याय मिळेल

न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल. 

बाकी राजीनामा देण्याच्या मागणी बाबत, तर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे, आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर 

 "