Sat, Jul 04, 2020 02:49होमपेज › Vidarbha › शिवसेनारूपी सावित्री सरकारच्या पाठीशी

शिवसेनारूपी सावित्री सरकारच्या पाठीशी

Published On: Jul 04 2018 2:23AM | Last Updated: Jul 03 2018 11:21PMनागपूर : वृत्तसंस्था

आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. शिवसेनारूपी सावित्री सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी असल्यानेच हे सरकार टिकून आहे, अशी बोचरी टीका विरोधकांनी केली आहे. आज (मंगळवारी) नागपुरात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व इतरही नेते उपस्थित होते.

अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी सरकारवर हल्‍लाबोल केला. शेतकरी, सामान्य माणूस, दलित, आदिवासी कोणालाही हे सरकार आपले वाटत नाही. त्यांच्या धोरणांचा सर्वांना फटका बसला आहे. या मुद्द्यांवर अधिवेशनात आम्ही सरकारला जाब विचारू, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी सामान्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे म्हटले आहे.

या मुद्द्यांवरून विरोधक राज्य सरकारला घेरणार

थेट मुख्यमंत्र्यांवर मुंबई सिडकोतील जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद या अधिवेशनात पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत विरोधकांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, या जमीन गैरव्यवहारावरून विरोधक थेट मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य करून, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर वातावरण आपल्या बाजूने वळविण्याचा जोरदार प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासोबतच कर्जमाफीतील गोंधळ, खरीप हंगामात शेतकर्‍यांना कर्ज देण्यास होत असलेला विलंब, पीक विमा, अफवेमुळे राज्यभरात जमावाकडून होत असलेल्या हत्या व त्या रोखण्यात सरकारला आलेले अपयश, पावसामुळे मुंबईत होणार्‍या दुर्घटना व मुंबईकरांचे हाल, कर्जमाफीनंतरही शेतकर्‍यांच्या न थांबलेल्या आत्महत्या या मुद्द्यांवरून विरोधक राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.