Wed, May 12, 2021 01:56होमपेज › Vidarbha › वीजग्राहकांकडे ३४ हजार कोटींची थकबाकी

वीजग्राहकांकडे ३४ हजार कोटींची थकबाकी

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 15 2017 1:26AM

बुकमार्क करा

 नागपूर  : उदय तानपाठक

राज्यातल्या 1 कोटी 45 लाख 84 हजार वीज ग्राहकांकडे 34 हजार 495 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एका तारांकित प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

अनिल बाबर, सुनील प्रभू, राधाकृष्ण विखे-पाटील आदी सदस्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ऊर्जामंत्र्यांनी ही माहिती दिली. वारंवार वीज खंडित होत असल्याने महावितरणचे वार्षिक 5 हजार 200 कोटींचे नुकसान होत असून उद्योग आणि कृषी क्षेत्राचे नुकसान त्याच्या चौपटीने होत असल्याचा दावा  प्रश्‍नकर्त्यांनी केला होता. 

या प्रश्‍नाला लेखी उत्तर देताना बावनकुळे यांनी ऑगस्टअखेरची आकडेवारी दिली असून त्यानुसार चालू स्थितीतील 1 कोटी 13 लाख ग्राहकांकडे 27 हजार 935 कोटी आहे. कायमचा वीजपुरवठा खंडित केलेल्या 32 लाख 83 हजार 906 ग्राहकांकडे 6 हजार 560 कोटी थकबाकी आहे. या थकबाकीपैकी 73 टक्के रक्‍कम पाणीपुरवठा, रस्त्यावरील दिवाबत्ती आणि कृषी पंपधारकांकडे असून कृषी पंपधारकांसाठी मुख्यमंत्री संजीवनी योजना राबविली जात असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी थकबाकीदारांवर वसुलीसाठी नियमांनुसार कारवाई सुरू असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी या उत्तरात म्हटले आहे. 

सुरक्षा ठेवीवर व्याज

राज्यातील वीजग्राहकांकडून मार्चअखेर सुरक्षा ठेवीच्या रूपाने महावितरणने 6 हजार 75 कोटी रुपये जमा केले असून या ठेवींवर कमाल 10.80 टक्के दराने व्याज दिले जात असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी अमिन पटेल, निर्मला गावित, अमित देशमुख आदिंच्या प्रश्‍नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.