होमपेज › Vidarbha › अंबाबाई मंदिर, राजर्षी शाहू महाराज संग्रहालय आराखड्यास मंजुरी

अंबाबाई मंदिर, राजर्षी शाहू महाराज संग्रहालय आराखड्यास मंजुरी

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 15 2017 2:47AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी 

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीराचा 78 कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा मान्य झाला असून शाहू महाराज संग्रहालयासाठी 13 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून या दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी 246कोटींच्या आराखडयाला मान्यता देण्यात आल्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी पुणे, कोल्हापूर व यवतमाळ येथील 10 पर्यटन स्थळांचा विकास करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी एका उपप्रश्नाला उत्तर देताना पाटील बोलत होते. त्यांनी सांगितले की, महालक्ष्मी मंदीर परिसराच्या 78 कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी उपप्रश्नाला उत्तर देताना पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले की, राज्याच्या पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येक जिल्ह्याला पर्यटन विकास आराखडा करण्यास सांगितले आहे. त्यापैकी 23 जिल्ह्यांनी आराखडे सादर केले असून अंतिम छाननी नंतर ते संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहे. सध्या 12 जिल्ह्यांच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.