Fri, Apr 23, 2021 13:52
रेमिडेसिवीर इंजेक्शन नागपूरात मेडिकल आणि फार्मसी स्टोअरमध्ये विकण्यास बंदी

Last Updated: Apr 07 2021 8:29PM

संग्रहित छायाचित्र
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

राज्याच्या उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे जिल्हा प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत शहरामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड्स आणि औषधांचासाठा कमी होत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे रेमिडेसिवीर इंजेक्शन नागपुरात मेडिकल आणि फार्मसी स्टोअरमध्ये विकण्यास जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी एक आदेश काढून बंदी घातली आहे.  

अधिक वाचा : करीनाच्या २५ हजारांच्या मास्कमध्ये आहे तरी काय? 

राज्याच्या अनेक भागात रेमिडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यामुळे काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. इंजेक्शनचा अनियंत्रीत वापर होत असल्याच्या तक्रारी समोर यायला लागल्यानंतर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी हा आदेश जाहीर केला आहे. 

अधिक वाचा : मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत १५ लाख कोटी मंजूर

यापुढे रेमिडेसिवीरचा थेट पुरवठा उत्पादक आणि पुरवठादारांकडून केवळ कोरोना रूग्णालय किंवा संबंधित रूग्णालयातील मेडिकल स्टोअर्सनाच करण्यात यावा, असे आदेश पुरवठादारांना देण्यात आले आहे. या शिवाय कंपन्या व रूग्णालयांत समन्वय ठेवण्यासाठी तसेच इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे व अन्न व औषध द्रव्ये प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पुष्पाहास बल्लाळ यांची नियुक्ती केली आहे.