Thu, Jul 02, 2020 11:32होमपेज › Vidarbha › नागपूर : विधान भवनातील बत्ती गुल; कामकाजावर 'पाणी'

नागपूर : विधान भवनातील बत्ती गुल; कामकाजावर 'पाणी'

Published On: Jul 06 2018 10:41AM | Last Updated: Jul 06 2018 11:29AMनागपूर : पुढारी ऑनलाईन

नागपुरात सुरू असणार्‍या मुसळधार पावसामुळे उपराजधानीत नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. पावसाचा फटका विधिमंडळ अधिवेशनालाही बसला असून सभागृहात पाणी शिरले आहे. तसेच वीज पुरवठा खंडित झाल्याने महाराष्‍ट्र विधिमंडळाचे कामकाज बंद करण्याची स्‍थिती इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पावसामुळे रस्‍त्यांवर पाणी साचले असून आमदारांना पाण्यातून वाट काढत विधान भवनापर्यंत यावे लागले. परंतु याठिकाणी पोहोचल्यानंतर वीज पुरवठा खंडित झाल्याने अधिवेशनाचे कामकाज बंदच ठेवावे लागले. 

शिवसेना सरकारवर बरसली

या घटनेनंतर शिवसेना नेत्यांनी भाजपवर टीकास्‍त्र सोडले. हा प्रकार मुंबईत घडला महापालिकेला जबाबदार ठरवत भाजप नेत्यांनी टाहो फोडला असता. नागपूर भाजपची राजधानी असून या ठिकाणीही महापालिका आहे. येथील दुरावस्‍थेचा फटका अधिवेशनालाही बसला आहे. त्यामुळे या प्रकारची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. 

आमदार निवासस्‍थानी गुडघाभर पाणी

विधिमंडळ अधिवेशनासाठी मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांची ज्याठिकाणी निवासाची व्यवस्‍था आहे तिथेही पावसामुळे गुडघाबर पाणी साचले आहे. इमारतही गळत असल्याने गैरकारभाराबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली. 

नियोजन शुन्य कारभारावर विरोधकांची टीका

विधिमंडळाच्या इतिहासात अधिवेशन काळात लाईट जाऊन कामकाज बंद पडावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारचा नियोजनशून्य कारभार, नागपूरला अधिवेशन घेण्याचा निरर्थक बालहट्ट यामुळे ही वेळ आली आहे, असे ट्‍विट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच सरकारच्या नियोजन नसताना नागपुरात अधिवेशन घेण्याच्या कृतीवरून टीका केली.  

वीज कुठेही गेली नाही : ऊर्जामंत्री बावनकुळे

विधान भवनातील वीज खंडित झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज कुठेही गेली नसल्याचा दावा केला. विधान भवनातील विद्युत विभाग खाली आहे. त्यात पावसाचे पाणी शिरल्याने वीज पुरवठा खंडित करावा लागला आहे. पाणी ओसरत नाही तोपर्यंत वीज बंदच ठेवावी लागणार आहे. वीज कुठंही गेली नाही, केवळ स्‍वीचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने बंद केली आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

सरकारचा हट्टीपणा नडला : अजित पवार

सरकारने हट्टीपणा करून ही वेळ आणली आहे. सकाळपासून आम्ही विधिमंडळात आहोत कुठेही लाईट नाही. लॉबीमध्येही अंधार आहे. याठिकाणी अधिवेशन घेत असताना जी काळजी घ्यायला हवी होती, ती सरकारने घेतली नाही, असा आरोप राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केला.