Thu, Jul 02, 2020 16:57होमपेज › Vidarbha › संघाचे सहकार्यवाह बदलण्याची चर्चा

संघाचे सहकार्यवाह बदलण्याची चर्चा

Published On: Feb 28 2018 7:46PM | Last Updated: Feb 28 2018 7:46PMनागपूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा मार्चच्या 9, 10 आणि 11 या तारखांना नागपुरात होत असून, या निमित्ताने पुन्हा एकदा संघाचे सहकार्यवाह बदलणार काय, यावर चर्चा सुरू झाली आहे. संघाचे विद्यमान सहकार्यवाह भैयाजी जोशी हे आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. त्यामुळे यावेळी सहकार्यवाह बदलला जाईल, असा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर भैयाजींच्या जागी संघाचे विद्यमान सहकार्यवाह दत्तात्रय होजबळे आणि दुसरे दोन सहकार्यवाह डॉ. व्ही. कृष्णगोपाल आणि व्ही. भामय्या या तिघांपैकी कोणीतरी एक त्या जागी येईल, असे बोलले जात आहे.

यापूर्वी 2015 मध्ये नागपुरात झालेल्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीपूर्वीसुद्धा भैयाजी जोशी जाणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती. भैयाजींचे वय आणि प्रकृतीच्या अडचणी लक्षात घेता, त्यांनी आपल्या निवृत्तीबाबत संघातील ज्येष्ठांना सुचवले आहे आणि यापूर्वी भोपाळ येथे झालेल्या प्रतिनिधी सभेत भैयाजींचा पर्याय कोण, यावर खल झाल्याचीही माहिती आहे. 9 मार्चपासून सुरू होणार्‍या या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सुमारे दीड हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. संघ परिवाराशी संलग्‍न असलेल्या विविध 40च्या वर संघटनांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार असून, याशिवाय विविध प्रांतांचे प्रचारक, प्रांत संघचालक यांचाही या प्रतिनिधी सभेत सहभाग राहणार आहे.