होमपेज › Vidarbha › राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी करा : प्रियंका चतुर्वेदी 

राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी करा : प्रियंका चतुर्वेदी 

Published On: Aug 12 2018 8:24PM | Last Updated: Aug 12 2018 7:36PMनागपूर : प्रतिनिधी 

राफेल विमान खरेदी प्रकरणात देशाचे १.३० लाख कोटींचे नुकसान होणार असून हा मोदी सरकारच्या काळातील महाघोटाळा आहे. याबाबत संयुक्त संसदीय समितीमार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या  प्रियंका चतुर्वेदी यांनी नागपुरात केली.

नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी चतुर्वेदी यांनी या महाघोटाळ्यात सत्ताधारीही भागीदार आहेत. असा घणाघाती आरोप करीत आम्ही सत्तेवर आल्यास या व्यवहाराचा पुर्नविचार करू असे संकेत दिले.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना आम्ही राफेल कंपनीकडून १२६ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील १८ विमाने तयार अवस्थेत तर उर्वरित विमानांचे फेर तंत्रज्ञान घेऊन भारतातच हिंदुस्थान एरोनॅटिस ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी उत्पादन करणार होती. मात्र हा करार रद्द करीत मोदी सरकारने ३६ विमाने तयार अवस्थेत घेण्याचा निर्णय घेतला. या प्रत्येक विमानाची किंमत संपुआ सरकारच्या काळात ५३६ कोटी इतकी होती.आता त्याच विमानाची किंमत १७०० कोटीवर गेली आहे. त्याचबरोबर उर्वरित विमाने तयार करण्याचे काम हिंदुस्थान एरोनेटिस ऐवजी रिलायंस एरोस्पेस या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यानंतर विमानांच्या देखभालीसाठी सुद्धा याच कंपनीला काम देण्यात आले असून यात एक लाख कोटीचा घोटाळा असल्याचे त्या म्हणाल्या.  तर ३६ विमानांच्या खरेदीत ३० हजार कोटी अतिरिक्त दिले जाणार आहेत. ही रकम करदात्यांच्या पैशातूनच दिली जाणार असून हा सरळसरळ राष्ट्रहिताशी धोका करण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.