Thu, Sep 24, 2020 16:18होमपेज › Vidarbha › पाकिस्तानचे भारताविरुद्ध 'गोड' कारस्थान!

पाकिस्तानचे भारताविरुद्ध 'गोड' कारस्थान!

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 15 2017 5:53AM

बुकमार्क करा

नागपूर : चंदन शिरवाळे

भारतातील साखर उद्योग अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तानने यंदा 15 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे कारस्थान रचले आहे. तेथील व्यापार्‍यांना साखर वाहतूक करात प्रतिटन 125 रुपये सवलत देऊन जास्तीत जास्त साखर भारतात निर्यात करण्याचे षड्यंत्र आखले आहे.

भारतीय व्यापार्‍यांनी ही साखर खरेदी केल्यास देशातील साखरेचे दर कोसळण्याची शक्यता आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकर्‍यांना याचा सर्वाधिक फटका बसेल, अशी चर्चा आहे.

गेल्या तीन वर्षांत समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे साखर उत्पादनात घट झाली आहे. उसाअभावी अनेक कारखाने आपला गाळप हंगाम पूर्ण करू शकले नाहीत. अशा परिस्थितीमध्येही देशात 40 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा आहे. शिवाय यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे.

देशाला दरवर्षी 240 ते 250 लाख मेट्रिक टन साखरेची गरज लागते. यंदा जवळपास 250 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. सध्या भारताकडे 42 लाख मेट्रिक टन साखर साठा आहे. यंदाचे उत्पादन आणि साठा विचारात घेतल्यास आपल्याकडे पुढील वर्षी 292 लाख मेट्रिक टन साखर उपलब्ध होईल.

सध्या भारतात साखरेचे दर प्रतिटन 3100 ते 3200 रुपये आहेत. पाकिस्तान सरकारने कारस्थान केल्यामुळे भारताच्या तुलनेत पाकिस्तानची साखर स्वस्त होईल. त्यामुळे येथील व्यापारी साखर आयात करण्याची शक्यता आहे. वाघा बॉर्डरमार्गे दिल्ली आणि तेथून हरियाणामार्गे पाकिस्तानची साखर भारतात आणली जाऊ शकते.

देशात अद्याप पाकिस्तानची साखर आली नाही. साठा असतानाही गेल्या वीस दिवसांमध्ये साखरेचे दर टनामागे 500 रुपयाने कमी झाले आहेत. मात्र, ग्राहकांसाठी व्यापार्‍यांनी दर कमी केले नाहीत. व्यापार्‍यांनी साखर आयात केल्यास देशातील दर आणखी कोसळू शकतात, अशी भीती राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्‍त केली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर स्थिर आहेत. त्यामुळे देशातील साखरेचे दर कोसळण्यामागे कोण आहेत, याची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. देशात साखरेचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे फिलिपाईन्स, इराणप्रमाणे केंद्र सरकारनेही साखर आयातीवर बंदी आणावी. निर्यात कर रद्द करावा, निर्यातीसाठी टनामागे 500 रुपये अनुदान द्यावे, असेही ते म्हणाले.