Tue, Jul 07, 2020 16:47होमपेज › Vidarbha › आपले राज्यकर्ते कधीच सहिष्णू नव्हते : एलकुंचवार

आपले राज्यकर्ते कधीच सहिष्णू नव्हते : एलकुंचवार

Published On: Feb 23 2019 1:45AM | Last Updated: Feb 23 2019 1:45AM
नागपूर : संजय कुळकर्णी

आपले राज्यकर्ते कधीही सहिष्णू नव्हते, असे खळबळजनक वक्तव्य करीत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी शुक्रवारी नागपुरात 99 व्या मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन केले. 

99 व्या मराठी नाट्य संमेलनचे उद्घाटन जेष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते नागपुरातील राम गणेश गडकरी नगरीत शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही अपरिहार्य कारणांमुळे येऊ शकले नाही. त्यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली. या संमेलनच्या उदघाटन सोहळ्यास मिळालेला नागपूरकरांचा अल्प प्रतिसाद देखील नोंद घ्यावा असाच ठरला.

एलकुंचवार यांच्या भाषणाकडे रंगकर्मींची करडी नजर होती. त्यांनी सुरुवातही तशीच केली. ते म्हणाले, मी या संमेलनात उद्घाटक म्हणून जातोय समजल्यावर मित्र दचकले. पण नयनतारा सहगल यांच्याप्रमाणे शेवटच्या क्षणी मला कुणी येऊ नका, असे म्हणाले नाही आणि उद्घाटक म्हणून मी इथे आज बोलू शकतो आहे. यवतमाळच्या संमेलनानंतर उद्घाटक म्हटले की मला दचकायला होते. तसाही मी इथे नाखुशीनेच आलो आहे. 

नागपूरकरांच्या आग्रहामुळे एलकुंचवारांनी उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारले, मात्र संमेलनासाठी कवीवर्य सुरेश भट सभागृहाच्या प्रवेशद्वारावर ते आले तेव्हा त्यांना घ्यायला कुणीही नव्हते. याचा राग आल्याने एलकुंचवार बराच वेळ कारमध्ये बसून राहिले. अखेर एलकुंचवारांचा हा ठिय्या समजल्यानंतर आयोजक धावत धावत आले आणि त्यांना मंचावर घेऊन गेले. या एकूण प्रकाराबद्दलची नाराजी एलकुंचवारांनी नंतर भाषणात बोलून दाखवली. सहिष्णूतेच्या नाटकाचा एक अंक नाट्यसंमेलनातही सुरू करीत एलकुंचवार म्हणाले, मला सहिष्णूतेबद्दल शंका आहे. कुठली मूल्य आपण मानतो , नाकारतो याच्यावर संस्कृतीची प्रतिंबब उमटतात.प्रस्थापिकांकडून विरोध होईल त्याला विरोध करून जेंव्हा नाटक होईल त्याला मी नाट्यधर्मी म्हणेन. तसेही आपले राज्यकर्ते कधीही सहिष्णू नव्हते. सफदर हाश्मीचा मुडदा पडला, सॅनेटिक व्हर्सेसवर बंदी आणली गेली, घाशीराम कोतवाल वादात सापडले. ही सारी असहिष्णूताच होती.  मला हल्ली शब्दांची धास्ती वाटते. नाट्य कर्मी आणि नाट्य धर्मी हे दोन शब्द हल्ली सर्रास प्रचलित आहेत. नाट्यधर्म हा शब्दप्रयोग डॉ. श्रीम लागू यांनी केलेला आहे. धर्म हा विषय गहन आहे , व्यापक आहे. माझ्यामते धर्म हा कोणालाही कळलेला नाही, असेही एलकुंचवार म्हणाले.

उद्घाटनाचे भाषण करता करताच एलकुंचवारांची प्रकृती बिघडली आणि त्यांना भाषण अर्धवट ठेऊन मंच सोडावा लागला. त्यांना उपराजधानीतील सेव्हन स्टार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थित असली तरी काही तपासण्या केल्यानंतरच त्यांना घरी पाठवण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. नाट्य संमेलनचा प्रारंभ हा पारंपरिक नांदीने झाला. दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन ज्येष्ठ  एलकुंचवार यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी , मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी , गिरीश गांधी इत्यादी पप्रभूती व्यासपीठावर उपस्थित होते. 

संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन गडकरी हे दिल्ली व्हाया लातूर व्हाया जबलपूर आणि नंतर संमेलनस्थळी आले. ते म्हणाले, मराठी नाटकांना राजाश्रय आणि लोकाश्रय मिळायला हवा, तसेच सरकारचा वरदहस्त हवा, आणि निर्मात्यांच्याकडून नाटकाची चांगली निर्मिती हवी अशी भावना  गडकरी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्राला नाटकाचा अभिमान असून नाटकांनी मोठी परंपराही निर्माण केली आहे. सरकारने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात 1200 क्षमतेची नाट्य गृहे उभारायला हवीत. नागपूर येथील सुरेश भट नाट्य गृहाचे भाडे हे फक्त 5 हजार रुपये घेतो आणि सोलार लावून खर्चात कपात झाली आहे. त्यामुळे या नाट्यगृहात प्रत्येक दिवशी कार्यक्रम हे फुल्ल असतात. अशी नाट्यगृहे महाराष्ट्रात उपलब्ध व्हावीत. 

98 व्या नाट्य संमेलनच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी 99 व्या नाट्य संमेलनच्या अध्यक्ष पदाची सूत्रे जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांना पारंपरिक अध्यक्षांची पगडी न घालता शिंदेशाही पगडी प्रदान केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात गज्वी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नाटकांवर भाष्य केले. स्त्री नाटककारांचा उहापोह केला. कलेची जोपासना करायची असेल तर आपल्या आजूबाजूचे वातावरण मुक्त असावे लागते, असे सांगून गज्वी म्हणाले, नाटक ही एक स्वतंत्र कलाकृती आहे ती कलांच्या आश्रयाने जगणारी कला आहे पण तसे आम्ही मानत  नाही. त्यांच्या छावणी या नाटकांसाठी किती झगडावे लागले याचा ही उल्लेख त्यांनी केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा पाढा वाचला तसेच नरेश गडेकर यांनी प्रस्ताविक केले. विष्णू जाधव यांच्या तिसर्‍या घंटेने नाट्य संमेलनाचा प्रारंभ झाला.