Tue, Jun 15, 2021 11:14होमपेज › Vidarbha › केंद्राने थकवली ओबीसी विद्यार्थ्यांची ९०० कोटींची शिष्यवृत्ती

केंद्राने थकवली ओबीसी विद्यार्थ्यांची ९०० कोटींची शिष्यवृत्ती

Published On: Dec 17 2017 2:59AM | Last Updated: Dec 17 2017 2:59AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी 

केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसून आतापर्यंत शिष्यवृत्तीचे 900 कोटी रुपये थकल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. विधान परिषदेत शुक्रवारी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हा आरोप केला.

गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकार मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहे. पण गेल्या तीन वर्षांत ही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे गजभिये यांनी परिषदेत सांगितले.  ई-शिष्यवृत्ती प्रक्रियेमुळे आणि इतर तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्जच भरले गेले नाहीत. त्यामुळे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे केंद्राने न दिल्यास त्याची पूर्तता राज्य सरकारने करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान  भाजप सरकारने ओबीसी आणि  व्हीजेएनटी यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा  44 हजार 500 वरून थेट  एक लाख रुपये अशी दुप्पट केली. केंद्रातील केंद्र सरकारने ओबीसींसाठी होणारा वार्षिक वाढीव खर्च राज्य शासनाने करावा असे कळविले आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अनुदान प्राप्त झाले नाही. केंद्र सरकारने  शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केले. शासनाने ई-शिष्यवृत्तीच्या इत्थंभूत कामासाठी पुणे येथील मास्कटेक कंपनीसोबत 30 एप्रिल 2016 रोजी करार केला. मात्र या सॉफ्टवेअरमध्ये असंख्य त्रुटी असल्याने सन 2016-17 या शैक्षणिक वर्षांत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही.  सन 2017-18 या वर्षासाठी ई-शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी महाडीबीटीअंतर्गत नागपूर येथील इन्व्होलेव मेसर्स कंपनीला कंत्राट सोपविले. पण ती कंपनीही अयशस्वी ठरली. ई-शिष्यवृत्तीसाठी इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत, याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश गजभिये यांनी सरकारवर केला. केंद्र, राज्य सरकारने या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय न घेतल्यास विद्यार्थी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.