यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचं संकट आल्यामुळे खवय्यांनी मटणाकडे मोर्चा वळवला आहे. मांसाहारी लोक चिकन आणि अंडीऐवजी मटणाला पसंती देत आहेत. मटणाचे वाढलेले दर कमी करण्यासाठी स्वाभिमान कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर दर नियंत्रित करण्याची मागणी केली आहे. (Non vegetarians prefer mutton instead of chicken and eggs due to bird flu)
बर्ड फ्लू सारख्या आजारामुळे अनेक ठिकाणी चिकन ऐवजी नागरिकांचा मटणाकडे कल वाढला आहे. मटणविक्रेते या संधीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप मटणप्रेमींनी केला आहे. शेतकरी आणि बचत गट यांच्याकडून कमी दरात बोकड खरेदी केली जातात. मात्र, अव्वाच्या सव्वा दर म्हणजे 700 ते 800 रुपये किलोने मटणाची विक्री केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मटणाच्या दर निश्चितीसाठी गैर शासकीय कमिटीची स्थापना करून विक्रेते व ग्राहकांत समन्वय साधून शहर व जिल्ह्यातील मटण विक्रीच्या दरावर नियंत्रण मिळवावे व मटणाचे दर नियंत्रित करावेत, अशी मागणी स्वाभिमान कामगार संघटेनेचे निरज वाघमारे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मटणप्रेमी आणि स्वाभिमान कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
यवतमाळमध्ये 800 रुपयांना 1 किलो याप्रमाणे मटण विक्रेते मटण विक्री करत असून सामान्य ग्राहकाची ही लूट आहे. त्यामुळे ही लूट थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.