Thu, Jul 02, 2020 18:57होमपेज › Vidarbha › वृत्तपत्र वितरण बंदी याचिकेवर पुढील सुनावणी १५ जूनला

वृत्तपत्र वितरण बंदी याचिकेवर पुढील सुनावणी १५ जूनला

Last Updated: Apr 23 2020 8:15PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा

वृत्तपत्र वितरणावर घातलेल्या बंदीबाबत राज्यसरकारकडून तुर्तास याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाल्यामुळे आता या याचिकेवर पुढील सुनावणी १५ जूनला होणार आहे. वृत्तपत्र वितरणावर घातलेल्या बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती. यावर राज्य सरकारने आज शपथपत्राद्वारे न्यायालयात राज्यसरकारची वृत्तपत्र बंदीबाबत भूमिका मांडली. महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांनी राज्य सरकारच्या वर्तमानपत्रावरील वितरण बंदीच्या  निर्देशाविरुद्ध रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमक्ष गुरूवारी (दि. २३) सुनावणी झाली.

वर्तमानपत्रे छपाईला बंदी नाही पण वितरणावर राज्य सरकारने बंदी घातली होती. मात्र, २२ एप्रिलपासून मुंबई आणि पुणे वगळता राज्य सरकारने वृत्तपत्र वितरणला पुन्हा परवानगी दिली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा प्रश्न तुर्तास मिटला आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी पुढील सुनावणी १५ जूनला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. वृत्तपत्र हे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नसल्यामुळे कोरोना सारख्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी वृत्तपत्र वितरण घरोघरी करण्यावर बंदी घातली होती, असे राज्य सरकारमार्फत न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. यावेळी याचिकाकर्त्यांतर्फे वकील अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण, राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी,  केंद्र  सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.