Mon, Jul 06, 2020 22:49होमपेज › Vidarbha › नाणारवासीयांनी शिवसेना आमदारांना हाकलून दिले; काँग्रेसचा हल्ला

नाणारवासीयांनी शिवसेना आमदारांना हाकलून दिले; काँग्रेसचा हल्ला

Published On: Jul 12 2018 12:39PM | Last Updated: Jul 12 2018 11:35PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे प्रेम बेगडी असून, बुधवारी नागपुरात आंदोलनासाठी आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना आमदारांना हाकलून लावल्याचे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले. त्यावर चवताळलेल्या शिवसेनेने विखे-पाटील खोटे बोलत असून, उलट कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शिवसेनेमुळेच प्रकल्प रद्द होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. त्यामुळे विखे - पाटील यांनी खोट्या आरोपाबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाणार प्रकल्पावर चर्चेची मागणी करीत स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केली. अध्यक्षांनी स्थगन नाकारला. मात्र, विखे-पाटील यांनी यावेळी बोलताना शिवसेनेच्या दुटप्पीपणावर जोरदार टोलेबाजी केली. प्रकल्पाबाबत दुटप्पी राजकारण करणारे या सभागृहात बसले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना खासदारही आत एक आणि बाहेर एक भूमिका घेत आहेत. शिवसेनेने निवडणुका आल्यामुळे या प्रकल्पाला विरोध सुरू केल्याचे प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना आमदारांना सुनावल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

त्यावर सुनील प्रभू म्हणाले, विरोधी पक्षनेते विखे-पाटील हे खोटे बोलत आहेत. उलट कृती समितीच्या अध्यक्षांनी शिवसेना आमदार भेटीसाठी शिवसेनेमुळेच जाणार असल्याचे सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट नाकारल्याबद्दलही प्रकल्पग्रस्तांनी धन्यवाद दिल्याचे प्रभू म्हणाले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, विखे-पाटील यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना सदस्यही नाणारविरोधात घोषणाबाजी करीत हौदात उतरल्याने कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आले. अखेर हा गदारोळ थांबत नसल्याने तालिका अध्यक्षांनी कामकाज पत्रिकेवरील कामकाज व विधेयके मंजूर करीत सभागृह दिवसभरासाठी स्थगित केले.

बोगस जमीन खरेदीची चौकशी करा : विखे

नाणार परिसरातील सर्व 17 गावांचा प्रकल्पाला विरोध आहे. ग्रामपंचायतीने तसे ठराव दिल्यानंतर राज्य सरकारने भूसंपादन प्रक्रिया बदलली. तेथे जे रहात नाहीत, अशा बड्या व्यापारी आणि राजकारण्यांनी जमिनी घेतल्या आहेत. मारुती मांजरेकर हे इसम 20 वर्षांपासून बेपत्ता आहेत. तरीदेखील बोगस कुलमुख्तीयार पत्र करून त्यांची जमीन लाटण्यात आली. याप्रकरणी अश्‍विनी आगाशे यांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र, कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, असे विखे-पाटील म्हणाले.

अणुऊर्जा आणि नाणार प्रकल्प एकत्र नको : भास्कर जाधव 

नाणार प्रकल्पाच्या शेजारीच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्याचे हवाई अंतर हे फक्‍त 1.2 कि. मी. आहे. हे दोन्ही प्रकल्प जवळजवळ करणे धोक्याचे असल्याचा अहवाल जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी दिला होता. या ठिकाणी काही अपघात घडला, तर कोकणच नव्हे, तर शेजारील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही हाहाकार उडेल. या प्रकल्पातून रोजगार मिळेल, असे सांगितले जात आहे. मात्र, आम्ही वाचलोच नाही तर या प्रकल्पाचा फायदा काय, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. तसेच या प्रश्‍नावर सर्व पक्षांनी राजकारण न करता विचार करावा, असे आवाहन केले. जैतापूर प्रकल्पाला राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. त्यामुळे आम्ही प्रकल्पाच्या विरोधात नाहीत. हवा तर हा प्रकल्प भाजप आमदार आशिष देशमुख यांनी सुचविल्याप्रमाणे विदर्भात न्या, असा टोला भास्कर जाधव यांनी हाणला.