होमपेज › Vidarbha › विदर्भ सिंचन घोटाळ्यात आणखी 6 गुन्हे

विदर्भ सिंचन घोटाळ्यात आणखी 6 गुन्हे

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 20 2018 11:30PMनागपूर : वृत्तसंस्था

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील घोटाळाप्रकरणी नागपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सहा गुन्हे दाखल केले. गोसेखुर्द प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील एकूण गुन्ह्यांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे.

गोसेखुर्द प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत नागपूरमधील एसीबीकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात मंगळवारी पोलिसांनी 6 गुन्हे दाखल केले. गोसेखुर्द प्रकल्पातील उजव्या कालव्यातील बांधकाम, अंभोरा उपसा सिंचन योजनेच्या वितरिकेवरील जलसेतूचे व लादीमोरीचे मातीकाम, घोडाझरी शाखा कालवा, मोखाबर्डी उपसा सिंचन मुख्य कालवा या कामांमधील भ्रष्टाचाराबाबत हे गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींमध्ये तत्कालीन अभियंते, विभागीय लेखाधिकारी, कंत्राटदार यांचा समावेश आहे.

भारतीय दंडविधानातील कलम 420, 468, 471 अन्वये हे गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या गुन्ह्यात आरोपींमध्ये गुरुदास मांडवकर (विभागीय लेखाधिकारी), संजय खोलापूरकर (अधीक्षक अभियंता), सोपान सूर्यवंशी (मुख्य अभियंता), देवेंद्र शिर्के (कार्यकारी संचालक), मे. खळतकर कन्स्ट्रक्शनचे जयंत खळतकर यांचा समावेश आहे.

दुसर्‍या गुन्ह्यात मुकेश राणे (कार्यकारी अभियंता), चंदन तुळशीराम जिभकाटे (विभागीय लेखाधिकारी), दिलीप पोहेकर (अधीक्षक अभियंता), सो. रा. सूर्यवंशी आणि देवेंद्र शिर्के यांचा समावेश आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये गोसेखुर्द प्रकल्पाच्या विविध कामांच्या कंत्राट प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून चार गुन्हे दाखल केले होते. वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणातून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 50 हजार 800 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.